कोकणातील निसर्ग अनुभवणे तसेच त्याचा लोक जीवनात होत असलेला वापर, याचा विचार केला तर निसर्गाचा इथल्या संस्कृतीवर खोलवर ठसा उमटला आहे. अर्थात प्रत्येक प्रांतात तो असतोच पण कोकणात वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीचा येथील, सणा समारंभात ते पूर्ण लोकजीवनावर परिणाम दिसतो. सहज म्हणून बाजारात गेलात तरी “गावठी” हा शब्द ऐकायला मिळेल. गावठी भाजी,  गावठी फळे,  गावठी केळी असे अनेक शब्दप्रयोग कानावर पडतील.

आजकाल घाटावरुन आलेले व्यापारी गावठी माल घेऊन बसतात. तर गावठी बायका घाटी भाज्या घेऊन बसतात व गावठी म्हणून सांगतात हा भाग वेगळा.

कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात होणार्‍या प्रत्येक नैसर्गिक उत्पादनाचे खास असे वैशिष्ट्य आहे. साधी फुलच जरी घेतली तरी फुलांचे प्रकार किती त्याचा वापर कसा होतो, हे पण लक्षात घेण्यासारखे आहे. कोकणी माणूस त्याच्याकडे फार चौकस नजरेने बघत नसला तरी वाढत्या जागतिकीकरणा बरोबर इथल्या साधन संपत्तीचे मार्केटींग वाढत आहे.

प्रवासास आवश्यक समान खरेदी करा अमेझॉन वर

प्रथम आपण फुलांचा विचार करु. आपल्या देशात फुलांचा सुकाळच आहे, तरीपण ताजी, टवटवीत व स्वतःचे वेगळेपण दाखवणारी फुले आपल्या जिल्ह्यातीलच.

कृपया फुलाचे नाव आणि चित्र यात काही चूक असल्यास जरूर कळवा.

Gulab flowers
Gulab flowers

गुलाब (Gulab, Rose, Rosa) :

गुलाब हे सर्वत्रच दिसणारे व मिळणारे फूल आहे. फुलवाल्यांकडे करंड्यात लावलेली, नर्सरी मधली गुलाब आणि एखाद्याच्या परड्यात किंवा बाजारात बायका घेऊन बसतात ते गावठी गुलाब बघताच त्यातला फरक जाणवतो. क्वचित दिसणारी ही फुले एखाद्या छानश्या मुलीच्या डोक्यात कधीना कधी बघायला मिळतात. सुंदर गुलाबी रंगाची टवटवीत फुले, पांढरट हिरवी पाने व मोठ्या आकाराच्या कळ्या आणि विशेष म्हणजे त्याचा वास. गावठी गुलाब वासावरुनच ओळखता येतो.

Zendu flowers
Zendu flowers

झेंडू (Zendu, Marigolds, Tagetes) :

सणासुदीला आता नर्सरीतले किलोवर मिळणारे झेंडू आणि आपल्याकडचा गोंडा. काही खेडूत बायका तो माळतात, पण आपल्याकडचा गोंडा एकदम टवटवीत, ताठ देठाचा व पाकळ्या आकर्षक, ठराविक आकाराचा. नारिंगी पिवळ्या रंगाचे गोंडे परड्यांमध्ये, बाद्यांवर ताठपणे उभे दिसतात. लांबूनच त्यांचा रुबाब दिसतो. न पेक्षा किलोवर मिळणारे विस्कटलेले, मरगळलेले झेंडू कुठे व आपला चार दिवसानीही टवटवीत दिसणारा गावठी गोंडा कुठे.

Jasvandi flowers
Jasvandi flowers

जास्वंद (Jaswandi, Hibiscus):

जास्वंदीचे खुपच प्रकार बघायला मिळतात. घराच्या कंपाऊंडमध्ये जास्वंद असणारच. मोठी लाल जास्वंदीची फुले सकाळीच टवटवीत दिसतात. कुठल्याही देवळात ताजी फुले वाहीली की देवाचा गाभारा प्रसन्न तर होतोच शिवाय घराघरात रोज पूजेला हीच फुले वापरतात. त्यात करुन कात्र्या कात्र्याची वर देठ असलेली सुंदर जास्वंदीची फुले हल्ली मात्र कमी पहायला मिळतात.

Aboli flowers
Aboli flowers

अबोली (Aboli, Firecracker, Crossandra infundibuliformis):

गावठी भाषेत आबोली. नारिंगी रंगाची फिक्कट अशी चार पाकळ्यांची साधी फुले. पण जत्रेत वळेसार व गजरे यांच फुलांचे. एक फुल तसं आकर्षक नसतं. पण त्याच्या दोन बाजूला दोन अशा पध्दतीने केळीच्या धाग्यांमध्ये ओवलेला वळेसार त्यातील अंबाडीचा नक्षीची पात्रे व कलाबूत एक वेगळेच आकर्षण निर्माण करतो. भरपुर फुलांचा गजरा डोक्यात असला की इतर फुलांची गरजच पडणार नाही.

Chafa flowers
Chafa flowers

चाफा (Chafa, Plumeria ):

देवळांच्या बाजूने चाफ्याचे झाड नाही असे सहसा होत नाही. पुर्वापार वाढलेला चाफा आणि त्याची पिवळी धम्मक टवटवीत फुले खास पुजेसाठी व पाडव्या दिवशी गुढी पुजताना त्याच्या माळा वापरतात. त्यात लाल चाफा पण असतो. चाफ्याचे खूप प्रकार आहेत. सोनचाफी हे मोठ झाड असतं व अत्यंत सुवासिक, नाजूक फुले पानाच्या खोलपीतून आजही विकायला येतात. एक फुल डोक्यात असेल तरी वासाने कोणाचही लक्ष आकर्षित करणारच. भुईचाफा, नागचाफा, हिरवाचाफा, कवठीचाफा असे अनेक प्रकार या मध्येही येतात.

Kevada flowers
Kevada flowers

केवडा :

बाजारात विकायला केवड्याची फुल येतात. सुंदर वासाचा आकर्षक केवडा नेहमीच बायकांच्या डोक्यामध्ये माळलेला दिसतो.

Kegadi flowers
Kegadi flowers

केगदी (kegadi, Pandanus odorifer):

साधारणपणे फुटभर लांबीचा, एका बाजूला फीकट पिवळसर पांढर्‍या रंगाची, जाड-रेखीव पाकळी व त्याच्या आतल्य बाजूने, जाडसर मऊ असा लांबट परागकणांचा भाग असतो. त्याना केगदीचा हाता असे पण म्हणत. आजकाल फँशनमुळे एवढे मोठे फुल सहसा कोणी माळत नाही. नदीच्या, ओढ्याच्या कडेला याची मोठी झुडपे असतात. खेडेगावातील बायकाना यांची फार हौस असते.

Bakul flowers
Bakul flowers

बकुळ (Bakul, Mimusops elengi):

ओवळीचे झाड, आंब्यासारखे मोठे झाड व त्याची अतिशय घोटीव मध्ये भोक व बाजूला कात्र्या कात्र्या असल्या पाकळ्या अशी फुले, फारच सुवासिक असतात. त्याचा वळेसार केळीच्या दोर्‍यात एकावर एक फुले ओवून बनवला जातो. स्त्रियांमध्ये लोकप्रिय तर आहेच पण अत्तरांसाठी याचा वापर होतो.

Surang flowers
Surang flowers

सुरंगी (Surangi, Mammea suriga) :

हे पण मोठे झाड असते व त्याच्या पुढच्या कोवळ्या फांद्याना ही छान सुबक फुले येतात. त्यांच्या कळ्या पण विकल्या जातात. त्यांच्या गजर्‍याना सुकवल्या नंतरही वास रहातो. मधमाशा झाडावरच काय पण विकणार्‍या बायकांच्या हातातील गजर्‍यांवरती असतात. पिवळ्या रंगाची ही फुले थोडी उग्र वासाची असतात.

jaai-flowers
jaai-flowers

जुई (Jui Jasmine, Jasmine Molle): 

या पण बारीक पांढर्‍या फुलांचा वेल जाई प्रमाणेच याचा पण मंडप घालण्याची पध्दत आह

Mogara flowers
Mogara flowers

मोगरा (Mogra, Jasminum sambac):

मोगर्‍याचा वेल असतो. तर बट मोगरा त्याची झाडे  असतात. पांढरी शुभ्र सुवासिक फुले एक किंवा गजरा करुन माळण्याची पध्दत आहे.

Kankar flowers
Kankar flowers

कंकर :

हे झाड मोठे असते व त्याची झुपक्याने फुलणारी फुले, मागे कळ्या दाणेदार नारिंगी पिवळ्या रंगाच्या व पुढे फुले लांब देठांची नाजूक असतात. लांबून नारिंगी पिवळी फुले गुलमोहरा प्रमाणे लक्ष वेधून घेतात.

Rudraksha flowers
Rudraksha flowers

रुद्राक्ष (Elaeocarpus ganitrus):

हे झुडूप वजा झाड आहे. त्याची पांढरी नाजूक फुले फार सुवासिक असतात. त्यात मधपण असतो. त्याचे गजरे माळण्याची पध्दत आहे.

white tagar flowers

तगर (Crape Jasmine, Tabernaemontana divaricata):

हे पण पांढरे शुभ्र फुल असलेले झाड तसे मोठे असते व त्याला मोठी फुले असतात व वास पण चांगला येतो. माळण्यासाठी व देवाला ही फुले वापरतात.

सब्दूली : 

ही पांढरी, लाल, पिवळी मिक्स कलरची नाजूक फुले झाड पण नाजूक झुडूप असते. माळण्यासाठी ही अंगणात लावली जातात.

भुतया :

चतुर्थी नंतर किंवा आसपास फुलणारी ही फुले बहूतांश खेडेगावात आढळतात. त्याला पांढरा, जांभळा रंग लांब देठ व वर तुरे असतात.

Devkel flowers
Devkel flowers

देवकेळ : 

लांबट मोठ्या पाकळ्यांची पिवळी, लाल किंवा मिक्स कलरची ही फुले दाटीवाटीने वाढलेल्या झाडावर आढळतात.

Shevanti flowers
Shevanti flowers

शेवंती (Yellow Chrysanthemum): 

घाटावरच्या शेवंतीपेक्षा इथली शेवंती खुपच वेगळी पिवळी, पांढरी छान लहान फुले असतात. नाजूक फुले व झाड पण नाजूक असते.

Kanheri flowers
Kanheri flowers

कणेरी (Cascabela thevetia): 

झाड मोठे, पिवळी, गुलाबी कणेरीची फुले अंगणातही आढळतात विशेषतः कंपाउंडला लावली जातात. त्याना वास नसतो.

करंडा : 

ही पण पिवळी कणेरी सारखीच लांबट फुले देवाला घालण्यासाठी वापरतात.

Sadafuli flowers
Sadafuli flowers

सदाफुली (Sadafuli, Catharanthus roseus):

ही तर प्रत्येकाच्या अंगणात असतेच. नेहमी फुलणारी चार पाकळ्यांची नाजूक फुले. गुलाबी, जांभळी, पांढरी फुले घरातच पुजेला वापतात.

सोनारीन :

शेतीच्या बांधांवर भात कापल्यानंतर फुलणारे हे रान फुल आहे. फिकट जांभळी मोठी फुले सहज लक्ष वेधून घेतात.

Gokarna flowers
Gokarna flowers

गोकर्ण (Clitoria Ternatea):

गडद जांभळ्या, पांढर्‍या रंगाची दुमडलेल्या पाकळ्याचे हे फुल वेलीवर वाढते.

Nishigandha flowers
Nishigandha flowers

निशिगंध (Nishigandh, Polianthes Tuberos):

अनेक घरांसमोर मंडप असतो. रात्रीच्या वेळी छान वास पसरतो. गुलाब बारीक पांढरा देठ असलेली नाजूक फुले, झुपक्याने फुलतात.

Lily flowers
Lily flowers

लीली (Lilium):

कंदमुळा प्रमाणे कंदापासून लांबट पानांची ही झाडे व त्याला छोटी किंवा मोठी भगव्या रंगाची आकर्षक फुले येतात.

Jui flowers
Jui flowers

 जाई (Jaai, Jasmine, Jasminum):

जाईची फुले नाजूक तसेच त्याचे वळेसार पण नाजूक. ते बनविताना त्यांचा देठ एका बाजूला ठेऊन केळीच्या दोर्‍यांमध्ये सुंदर गुंफण घालून बनवले जातात. माळताना पण अंबाड्याच्या भोवती माळल्यावर आकर्षक व सुवासीक फुले लक्ष खेचून घेतात.

कोकणातील सुवासिक फुले…सना

कोकणातील सुवासिक फुले
Tagged on: