कोंकण दर्शन डायरी:परशुरामाचे मंदीर

दापोलीहून परतल्यावर चिपळूणला हायवेवरच्या एक साध्याच हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. पहाटे लवकर जाग आली. अंघोळ आटोपून कोंकण दर्शन च्या तयारीने खाली उतरलो तर सातच वाजले होते. पहिला चहा तयार होत होता. चहा घेऊन बाहेर आलो तर संपूर्ण शहर धुक्यात बुडालेले दिसले. अगदी ५० मीटर वरचे सुद्धा काही स्पष्ट दिसत नव्हते. लोक म्हणाले की १० वाजे पर्यंत तरी धुकं निवळणार नाही. मध्ये परत ३-४ चहा झाले. शेवटी नऊ वाजता बाहेर पडलो कारण परशुराम घाट पाहण्यासाठी जवळजवळ अकरा की.मी. मागे जायचे होते.

घाटातला देखावा फारच मनोहर होता. खरेतर खाली जमिनीवरून सूर्य दिसत नव्हता पण  घाटातून सर्वदूर पसरलेली धुक्याची सफेद चादर व त्यावर चकाकणारी सूर्य किरणे दिसत होती!! थोड्या वेळाने मंदीराकडे पोचलो. परशुरामाच्या भूमीत जन्म घेऊनही मी आजवर परशुरामाचे मंदीर पहिले नव्हते त्यामुळे मला फारच उत्सुकता लागून राहिली होती. मंदीर फारच सुंदर आहे आणि तेथील अन्य व्यवस्थाही फार उत्तम आहेत.

Konkan Darshan diary day four  17-11-2011 :

from Parshurama Ghat in Chiplun to Dervan to Marleshwar to Jaigad, Malgund  and ended at Ganpatipule in Ratnagiri district.

https://www.facebook.com/media/set/?set=a.355167021164618.102153.351758361505484&type=1&l=c15a80def3

कोंकण दर्शन: डेरवण आणि मार्लेश्वर

काहीवेळाने मगे परत चिपळूणला येऊन डेरवणला निघालो. रस्ता तसा बराच दुरचा होता आणि हायवे असल्याने खिडकीतून बाहेर पाहण्यासारखे काहीच नव्हते. शेवटी बऱ्याच वेळाने डेरवणला पोचलो. डेरवण येथे शिवाजी महाराजांची जीवन गाथा अतिशय कलात्मक रीतीने सुंदर चित्रे व पुतळे वापरून सजीव केलेली आहे. बराच वेळ लाऊन मी ते सर्व पाहिलं. आतमध्ये एक मठ सुद्धा आहे पण मी हाफ प्यांटीत असल्याने मला तिथे प्रवेश मिळाला नाही.

डेरवणहून पुन्हा मागे हायवेला येऊन मार्लेश्वरच्या दिशेने निघालो. हायवे सोडल्यानंतर पुढे एकेरी रस्ता होता त्यामुळे मार्लेश्वारला पोचायला बराच वेळ लागला. शेवटी दूरवरून मार्लेश्वरचा डोंगर दिसायला लागला आणि थोडे बरे वाटले. तरीही तिथे पोचायला आणखी अर्धा तास लागला. मंदीर पहायचं तर पाचशेच्या वर पायऱ्या चढून जावे लागते. मला ते जमेल की नाही याची शंका होती पण हळूहळू करत वर  पोचलो. डोंगरातील छोट्याश्या गुहेत शिवलिंग आहेत. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच धबधबा आहे, कदाचित पावसाळ्यात तेथील दृष्य चांगले दिसत असेल.

पुन्हा हळूहळू पायऱ्या उतरायला सुरुवात  केली. मार्लेश्वर येथील सर्व परिसर अतिशय निसर्गरम्य आहे पण खालपासून अगदी वरच्या पायरीपर्यंत एकाबाजूने कायम स्वरूपी असणारे विक्रेत्यांचे विवीध प्रकारचे ठेले, त्यातून निर्माण होणारा कचरा व सततच्या गोंगाटाने होणारा शांतता भंग आशा अनेक कारणांनी या स्थानाला एक प्रकारे ओंगळवाणे स्वरूप आले आहे. इतर काही मंदिरांपेक्षा मला ते इथे अधिकच जाणवले.

कोंकण दर्शन: जयगड

आता इथून निघून पार विरुद्ध दिशेला समुद्रापर्यंत कोंकण दर्शन जयगडला जायचे होते. वाटेत मुद्दाम थांबून पाहण्यासारखे काहीच नव्हते आणि एरवी दुपाच्या प्रवासात हटकून येणारी झोपही गायब झाली होती. मुरुडहून पुन्हा परशुराम घाट, डेरवण व मार्लेश्वर पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यापासून बरेच दूर जावे लागले अन्यथा लाडघर, कोलथरे, दाभोळ मार्गे धोपवे पर्यंत येऊन पुन्हा गुहागर मार्गे पुढे पालशेत, वेळणेश्वर, नरवण करत रोहिले बंदरातून जयगडला अगदी किनारी मार्गाने येता आले असते. जयगडच्या किल्ल्याची अवस्था फारच वाईट झालेली आहे त्यामुळे तिथे पाहण्यासारखे काहीच नाही. पण तिथल्या निळ्याशार समुद्राकडे पाहताना थोडा श्रम परिहार झाला.

सायंकाळचे पाच वाजत आले होते त्यामुळे आम्ही आता गणपतीपुळेच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत मालगुंडला पोचताच मात्र करीत तिथल्या समुद्र किनाऱ्यावर उतरल्याशिवाय राहवले नाही. अतिशय स्वच्छ, शांत आणि दूरपर्यंत पसरलेला किनारा, सूर्यास्त होण्याच्या वेळी खूप छान वाटला. इथला सूर्यास्त अगदी चित्रातल्या सारखा वाटला. सूर्य पूर्ण खाली गेल्यावर आम्ही परत प्रवास सुरु केला. काही वेळातच गणपतीपुळेला पोचलो. इथेही काही छान फोटो काढायला मिळाले. किनाऱ्यावर मधेच उभ्या असलेल्या फलकाकडे लक्ष गेले. त्यावर गेल्या काही वर्षात समुद्रात बुडालेल्यांची नवे होती. बहुधा समुद्राला प्रथमच भेट देणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्यातील धोक्यांची विशेष माहिती नसते तसेच किनाऱ्यावर कोणतीही जीवन रक्षक व्यवस्थाही नसते. त्यामुळे सर्वांनी पाण्यात जाताना योग्यती काळजी घ्यावी.

आता पूर्ण अंधार झाला होता आणि रात्रीचा मुक्काम रत्नागिरीला करायचा होता. सागरी मार्गाने रत्नागिरीला आम्ही फारच लवकर पोचलो पण हॉटेल शोधता शोधता दीड तास वाया गेला. शेवटी एके ठिकाणी काहीसं महाग हॉटेल मिळालं. जेवण झाल्यावर अक्षरशः पाचच मिनिटात झोपेच्या अधीन झालो.

कोंकण दर्शन - Konkan darshan
Konkan Tour

|| इतिश्री कोंकण दर्शनं चतुर्थोऽदिन समाप्त: ||
|| श्री परशुरामार्पणमस्तु ||

नाना

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about Natya Sangeet, Writing and about Malvani of course.

Latest posts by नाना (see all)

कोंकण दर्शन डायरी १७-११-२०११
Tagged on: