कोंकण दर्शन – हरिहरेश्वर: MTDC मध्ये सकाळी जाग आली तेंव्हा ७ वाजले होते. रातीच्या काळोखात जाणवले नव्हते पण सकाळी झालेले पहिले इम्प्रेशन म्हणजे हॉटेलची व्यवस्था सुमार दर्जाची असली तरी परिसर मात्र अतिशय निसर्गरम्य होता. विकएंडला २-४ दिवस काढायला फार छान व निवांत वाटेल. चालत खाली कॅन्टीनला चहासाठी गेलोतर तिथे कुणी उठलेही नव्हते. जरा पुढे जाताच लाटांचा आवाज आला आणि मग सकाळच्या सूर्याचे मनोहर दर्शन झाले. मागे परतताना झाडांमधली खसखस ऐकली, चक्क दोन लांडोरी चरत होत्या. अंघोळीनंतर हरिहरेश्वराच्या मंदिराकडे निघालो. बाजूलाच काल भैरवाचे मंदिर आहे. इथून पाहताना समोरच्या सागर किनाऱ्याचे फार छान दर्शन होते. अजूनही बराच प्रवास करायचा असल्याची जाणीव सतत असल्याने आता आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने निघालो.

Konkan Darshan Diary – Day two

from Harihareshwar to Shrivardhan, Diveagar, Mahad, Raigad Fort and night halt at Poladpur in Raigad district.

https://www.facebook.com/media/set/?set=a.1458754314139211.1073741832.351758361505484&type=1&l=5a5ac05670

कोंकण दर्शन – श्रीवर्धन

श्रीवर्धनला पोचल्यावर प्रथम समुद्र किनाऱ्यावर गेलो. किनाऱ्यावर डाव्याबाजूला एक मोटरगाडी चक्क समुद्राच्या पाण्यात उभी होती. कदाचित अचानक आलेल्या भरती मुळे तसं झालं असावं. गावात परत आल्यावर पेशवे स्मारक पाहिलं आणि मग दिवेआगरला निघालो. इथला किनारा व माडा पोफळीच्या बागा पाहून फारच आनंद वाटला. दिवेआगरला MTDC तर चक्क समुद्र किनाऱ्यावरच आहे. १५-२० मिनिटं थांबून आता आम्ही हायवेला महाडच्या दिशेने निघालो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनीत केलेल्या महाडच्या इतिहास प्रसिद्ध तळ्याला भेट दिली आणि पुन्हा हायवेला आलो.

कोंकण दर्शन – रायगड किल्ला

वाटेत येताना रायगड किल्ला २४ कि.मी. असल्याचं पाहिलं होतं. खरं तर किल्ल्यावर जाण्याचा मुळीच विचार नव्हता कारण मला वर चढून जाणं कठीण वाटत होतं. फक्त दुरूनच फोटो काढण्याचा विचार होता. पण स्पॉट काही मिळेना आणि पुढे जाता जाता शेवटी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. चित्त दरवाज्या कडून वर जाणाऱ्या १५०० पायऱ्या आहेत हे समजल्यावर मी कधीच वर पोचणार नाही असं वाटलं पण तेवढ्यात हिरकणीवाडीतून रोपवे असल्याचही समजलं – हा रोपवे म्हणजे चक्क केबल कारच आहे हे ऐकून मन शांत झालं.

कधी कधी किती बेत ठरवून सुद्धा देवदर्शन होता होत नाही आणि इथेतर मला चक्क तिसरं ऐतिहासिक स्थळ पाहण्याचा योग आला होता, एकाच दिवसात. आता मात्र भूक जाणवू लागली. देशमुखांच्या हॉटेल मधील शाकाहारी व मांसाहारी जेवण दोन्ही फार छान होतं. जेवणानंतर देशमुखांची ओळख करून घेतली. थोडा वेळ बसून हिरकणीवाडीला निघालो.

कोंकण दर्शन – रायगड किल्ला रोप वे

वाटेत दूर वरूनच रोपवे दिसत होता तो पाहत आम्ही तिकीट घराकडे पोचलो. मी एकटाच वर निघालो कारण ड्रायव्हरला वर यायचं नव्हतं, मला खरोखरच त्याची कीव आली. संथ गतीने जाणाऱ्या केबलकार मधून खाली दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा न्याहाळत यथावकाश मी वर पोचलो – समुद्र सपाटीपासून २७०० फुट उंचीवर. किल्ल्यावर पाय ठेवताच पहिलं आश्चर्य दिसलं ते म्हणजे एका डबक्यात मजेत डुंबणाऱ्या म्हशी. थोड्या वेळासाठी वाटलं या सुद्धा केबलकार ने वर आल्या की काय? मागाहून समजलं की किल्ल्यावर अजूनही बरीच माणसं राहतात म्हणजेच पाणी व इतर जीवनावश्यक वस्तू मिळत असल्या पाहिजेत.

कोंकण दर्शन – रायगड किल्ला – गाईड सुनील

बहुतेक करून माणसं ग्रुपने वर ये जा करतात. संध्याकाळची वेळ व मंगळवारचा दिवस असल्यने गर्दी कमी असावी. माझ्या दिशेने एकदम तिघेजण आले  “साहेब, गाईड पाहिजे का?” अशी विचारणा झाली. मी थोडावेळ दुर्लक्ष केलं पण मग माझ्या लक्षात आलं की एवढा मोठा किल्ला व्यवस्थित जाणून घायचा तर गाईड पाहिजेच. मी सहजच म्हटलं की मला जो पोवाडा म्हणूंन दाखवील तो माझा गाईड. सुनील अवकीरकर हा पोरगा लगेच तयार झाला. त्याला चंद्रकांत व शाम अवकीरकर आणि तिकीट मास्तर दादासाहेब लोखंडे यांनी साथ दिली. त्याने फारच छान म्हटलं पण तो पोवाडा नव्हता. तिघेही भाऊ भाऊ हिरकणीच्या वंशातील होते, मुक्काम किल्ल्यावरच त्यामुळे त्यांच्या सारखे जाणकार गाईड भेटल्याचा आनंद वाटला. मी सुनीलला घेऊन पुढे निघालो.

सुनीलने अतिशय उत्साहाने किल्ला दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणाची तपशीलवार माहिती, सोबत इतर कथा, काव्य आणि काही वेळा रक्त उसळवणारे संवाद. मी गुंग होऊन सर्व काही प्रत्यक्षच घडत असल्यासारखे ऐकत व पाहत होतो. लहान पाणी पासून ऐकलेल्या महाराजांच्या व मराठ्यांच्या इतिहासाची उजळणी झाली. फार फार छान वाटल. मी इथे किल्ल्याचे काही फोटोग्राफ व विडीओ दिलेत. किल्ल्याचे वर्णन मात्र मी इथे देणार नाही – ते तुम्ही पुस्तकातून, जाणकाराकडून किंवा रायगड वरच्या गाईड कडून घेतलेले उत्तम.

कोंकण दर्शन – रायगड किल्ला – अधिक माहिती

तूर्तास गुगलअर्थ वर किल्ला पहायचा असल्यास   http://wikimapia.org/#lat=18.2334071&lon=73.4487534&z=16&l=0&m=b   ला भेट द्या. मला जसं म्हशींच आश्चर्य वाटलं तसचं राज्याभिषेकाचे वेळी इंग्रजांना किल्ल्यावरील हत्तींचे – हत्ती फार लहान असतानाच किल्ल्यावर नेले गेले होते, किल्ल्यावर बरेच तलाव आहेत त्यात एक हत्ती तलावही आहे. सध्या रायगड किल्ल्यावर किमान दोन उपहारगृह आहेत, MTDC रेसोर्ट आहे, व पूर्वापार राहणारी काही माणसे आहेत. किल्ला पाहून झाला.

खाली आलो तेंव्हा सहा वाजत आले होते. हळूहळू महाडच्या दिशेने निघालो. हायवे वर मुक्कामासाठी हॉटेल शोधत शेवटी पोलादपूरला हॉटेल बालाजी मध्ये पोचलो. हॉटेल परिसर छान निसर्गरम्य वाटला. जेवण तर फारच छान होतं – माझ्या नऊ दिवसाचा प्रवासातील नंबर १. जेऊन मस्त झोपी गेलो.

कोंकण दर्शन डायरी konkan-darshan

|| इतिश्री कोंकण दर्शनं द्वितीयोऽदिन समाप्त: ||
|| श्री परशुरामार्पणमस्तु ||

नाना

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about Natya Sangeet, Writing and about Malvani of course.

Latest posts by नाना (see all)

कोंकण दर्शन डायरी १५-११-२०११
Tagged on: