आई - mother

आई

कळत-नकळतच्या चुकांसाठी
कधी आईनं मला मारायचं
मग तिनच शिवलेल्या वाकलीखाली
हळूच येऊन रडायचं

धुसमुस-धुसमुस वाकळीखाली
फक्त मी एकटा
भोवताली घट्ट काळोख
आतून चेहरा तापलेला

तिच्या चेहर्‍यावरचा राग आठवत
माझाही गाल फुगायचा
डोळ्यांसमोर डोळे दरडविताना
डोळा उगीच भरायचा

कधी हुंदका अनावर होत
गालही चिंब भिजायचे
मग स्वतःचीच समजूत काढत
गालावरून हात सरकायचे

वाकळीत घट्ट लपेटून असताना
मग दोन हात सरकायचे
कुशीत घट्ट ओढत
ह्ळूच पाट थोपटायचे

एक पदर अश्रू फुसत
हळूच ओला व्हायचा
गालावरचा फुगवा अन् डोळ्यांचा रूसवा
कुठच्याकुठे पळायचा

मग वाकळीखालीच ओल्या पदरानं
हळूवार काहीतरी गुणगुणायचं
ओल्या उबार्‍यात धुंद झोपताना
गालावर हसू खुलायचं

-अमर पवार

 

amarp

Guest writer

Latest posts by amarp (see all)

आई
Tagged on: