नमस्कार मंडळी! बऱ्याच काळानंतर चार वर्षांपूर्वी गणपति साठी गावात आलो तेंव्हा आईची तब्येत बरीच खालावली होती. तिची इच्छा होती की तिचे शेवटचे दिवस गावातच जावेत. मला धड चहा सुद्धा करता येत नाही जेवणाची तर बातच सोडा. मुळातच आमच्या वाडीत अगदी मोजकी माणसं आणि वाडी गावापासून बरीच दूर असल्याने जेवण करायला किंवा अन्य कामासाठी माणूस मिळणं कठीण होतं. पण राहायचं नक्की होतं. मनाशी ठरवलं की कुणाच्याही विनवण्या न करता आपल्याला जमेल तसं इथे रहावं. चक्क एक वर्ष गावातल्या एकमेव खानावळीतून डबा आणून दोघेही जेवायचो. शेवटी नशिबाने एक बाई जेवण बनवण्यासाठी मिळाली. थोडं फार आईला पण सांभाळायची. धाकटा भाऊ सूद्धा कणकवली हून मदतीसाठी अधेमध्ये यायचा. या वर्षी गौरीपूजनाच्या दिवशी वृद्धापकाळाने आईचं निधन झालं. सहजीकच खूप रडूं आलं, पोरकेपणाची जाणीव झाली पण आईला खरी गरज होती तेव्हां माझ्या हातून यथाशक्ती सेवा घडल्याचं समाधानही होतं.

तेल गेलं तूपही गेलं:

इथे येताना इंटरनेट वरून करता येणारं काम हाती होतं त्यामुळे मी बिनधास्त होतो. पण काही दिवसातच BSNL च्या BROADBAND ने माझं ब्यांड वाजवलं. 4 MBPS च्या प्लान ला जेमतेम 1.5 स्पीड तेही दर 10-15 मिनिटांनी तुटायचं, त्यावर रिमोट सर्व्हर ऑपरेट करणं अश्यक्य झालं. कणकवलीत जाऊनही विशेष फरक पडत नव्हता. मग काय, हातातली कामं सोडावी लागली. वारंवार होणारे hacking attacks आणि मेंटेनन्सला कंटाळून वर्षभरातच माझ्या वैयक्तिक साईट सूद्धा बंद पडल्या. अर्थातच malvani.com सूद्धा!

पन्नाशीनंतर भारतात नोकरी मिळवणं ही गोष्ट माझ्या भाग्यात नव्हती. इतर काही धंदे करून पहिले पण तेही जमलं नाही.  पैसा मात्र बराच घालवला. पण इथे राहून वेळ कसा घालवावा हा मात्र मोठा प्रश्न तसाच होता. पूर्वी फक्त गणपतिला आठ दिवस येऊन रहायचो. गणपति गेल्यावर वाडीतली सर्वच घरं रिकामी होतात. फक्त आठच घरं आहेत, पहिल्या आणि शेवटच्या घरात एक किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर आहे. पावसाळ्यात बाजारात जायचं तर स्कूटरने साडेसहा किलोमीटरचा फेरा पडतो. टीव्ही आणि फोन नसेल तर आपण परग्रहावर तर नाही ना अशी शंका येते.

गावात माझी बागवानी

 

गावात माझी बागवानी - my-gardning
गावात माझी बागवानी

आयुष्यात प्रथमच थोडी झाडं लावण्यावर लक्ष केंद्रित केलं. आता बर्ड चेरीच्या झाडांवर सिझन मध्ये पूर्वी न पाहिलेले पक्षी दिसतात. चेरीची झाडं लावली. पारिजात आता फुलायला लागला आहे. नारळ, मीर फणस, शेगुल, केसर आंबा, केळी, पेरू आणि संत्री मोसंबीची एक दोन एक दोन अशी झाडं लावली. थोड्या जागेत फळभाज्याही लावल्यात. आजूबाजूला सर्व जंगल असल्याने मध्ये मध्ये माकडांच्या टोळ्या येऊन बरीच नासधूस करतात. तरीही मी नाउमेद होता हे करत रहातो.

आई गेल्यानंतर मात्र इथे गावात आणि घरातही मन रमत नाही. इथे आता एकट्याने रहाणं कठीण आहे. एके दिवशी पुन्हा malvani.com साईट सुरु करावीशी वाटली आणि मी लगेचच लिहायला सुरुवातही केली. असाच भेटत राहीन. लोभ असावा. धन्यवाद.

bird cherry visitor
बर्ड चेरी वर पाहुणा
bird cherry guest bird
बर्ड चेरी आलेला पक्षी
kokila -my-gardning - Cuckoo Bird
कोकिळा माझ्या बागेत – Cuckoo Bird
Sutar pakshi - Woodpecker
सुतार पक्षी – Woodpecker

गावातल्या गावात
Tagged on: