कोकणातल्या गोष्टी सांगताना भूतावळ बाहेर येणं साहजिकच आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवणे न ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अगदी स्वत:ला असा एखादा अनुभव आला तरीही त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. ज्योतिष शास्त्राप्रमाणे अशा गोष्टींचा अनुभव येणं न येणं, त्यापासून काही हानी होणं इत्यादी त्या माणसाची राशी – गण वगैरेवर अवलंबून असतं असं म्हणतात. सुदैवाने मला अजून तरी मोठासा भीतीदायक वैयक्तिक अनुभव आलेला नाही. विशेषतः हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हे अनुभव येतात आणि विशेष म्हणजे त्यांना ते सहन करण्याची आणि नेहमीचा जीवनक्रम चालू ठेवण्याची क्षमताही असते. फारच भयानक घटना घडल्या तरच त्या बाहेरच्या लोकांना कळतात.

इथे दिलेले अनुभव हे माझे व माझ्या घरातल्याच माणसांचे आहेत त्यामुळे मलातरी त्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. जागा व माणसांची खरी नावं मुद्दामच इथे दिलेली नाहीत.

१. माळावरची पहाटेची मेजवानी

early morning feastसकाळी पावणे सहाची कणकवली एसटी पकडण्यासाठी माझा भाऊ पाच वीसला घरातून बाहेर पडायचा. एके दिवशी त्याचे सोबत गावातलाच चुलत भाऊ सुद्धा होता. थंडीचे दिवस असल्याने सकाळचे साडेसहा वाजले तरी काळोख असायचा. रोजची पायाखालची वाट दोघेही तरातरा चालत होते.

चहूबाजूंनी बऱ्याच अंतरापर्यंत भातशेती पसरलेली आणि वाटेतल्या छोट्याशाच माळावरच्या एकमेव झाडापर्यंत येता येता त्यांना थोडीशी चाहूल जाणऊ लागली. भांड्यांचे आवाज, फोडणीचे तळणीचे चुरचुर आवाज आणि अन्न शिजत असल्याचा घमघामट. पहाटेच्या वेळीसुद्धा भूक चाळवणाऱ्या मेजवानीच्या वासाचे कुतूहल वाटून थोडावेळ झाडाखाली थांबण्याची भावाला तिव्र इच्छा झाली. तो दुसऱ्या भावाला बोलला “बाळ्या तुका कसलो वास येता काय रे?” बाळ्याने तोंडावर बोट ठेऊन चुपचाप चालत रहाण्याची खुण केली तेव्हां त्याला त्यातील वैचित्र्य जाणवलं. उरलेली अर्धी वाट त्यांनी जवळपास धावतच पार केली. बस स्टॉपवर येताच दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दुसरा पर्यायच नसल्याने त्या वाटेने नंतरही अनेकवेळा त्याचं येणं जाणं झालं. परंतु सुदैवाने पुन्हा केव्हांच असा अनुभव आला नाही.

२. नवीन घर झालं शापित

Cursed Houseपूर्वजांनी बांधलेलं घर जवळपास शंभर वर्षे उलटून गेल्यामुळे बरचसं मोडकळीला आलं होतं. आम्ही केवळ गणपति साठी आणि केव्हांतरी मे मध्ये गावात यायचो. काकांनी आणि बाबांनी तेव्हां नवीन घर बांधायचं ठरवलं. गावातल्या पद्धती प्रमाणे देवाचा कौल प्रसाद अगोदर घ्यावा लागतो. पण तो न घेताच विहिर जवळ पडेल असं पाहून घर बांधलं. गृहप्रवेशाच्या दिवशी सकाळपासूनच काकांना बरं वाटत नव्हतं त्यामुळे त्यांना कणकवलीत हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. गृहप्रवेश आटोपला, आठ दिवसांनी काका हॉस्पिटल मधेच गेले. जिवंतपणी ते नवीन घरात काही येऊ शकले नाही.

नंतर ३-४ वर्षांनी बाबा रिटायर होऊन आईसह तिथे रहायला आले. रात्री नाऊ-साडेनऊ च्या दरम्यान ते जेवायला बसत. त्याच वेळे दरम्यान, अगदी रोज बाहेरचा दरवाजा ढकलल्याचा आवाज होई. “कोण रे?” असं विचारलं तर तर उत्तर येत नसे किंवा दरवाजा उघडून पाहिल्यावर बाहेर कुणीच नसे. हा प्रकार ते तिथे असेपर्यंत चालूच राहिला पण काही काळाने त्यांना या गोष्टीची सवय झाली आणि त्याकडे ते दुर्लक्ष करू लागले.

नंतर काही काळाने डहाणू हून आमचे स्वामीजी काही कार्यानिमित्त त्या घरात आले होते. गोष्टींच्या ओघात त्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं ते असं- काही अदृष्य शक्तींची येजा करण्याची वाट ठरलेली असते त्यापैकी काहींना मानव निर्मित अडथळ्याची बाधा येत नाही आणि ते आरपार ये-जा करू शकतात तर काही ती बाधा पार करू शकत नाहीत किंवा आपली वाटही बदलू शकत नाहीत. थोडक्यात घर बांधण्यापूर्वी आम्ही ती जमीन योग्य असल्याची खात्री करायला हवी होती. लवकरच आम्हाला त्यातील तथ्याची प्रचीती आली. १५ वर्षांतच ते घर हळू हळू आतून बाहेरून पूर्ण मोडकळीस आल्यामुळे आम्हाला पुन्हा दुसऱ्या जागेत नवीन घर बांधावं लागलं.

३. चकवा

Chakva - Semblanceहा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कुडाळ हून काही कामं आटोपून एकटाच ड्रायव्हिंग करत येत होतो. दुपारचे दोन वाजत आले होते. गावातल्या मुसलमान वाडीच्या थोडं पुढे रस्त्याच्या बाजूलाच एक आंब्याचं भरगच्च झाड आहे. तिथून डाव्या बाजूला आमचं घर अर्ध्या किलोमीटर वर. झाडाखाली येता येता मला उजव्या बाजूला सुद्धा तसाच रस्ता दिसू लागला आणि त्याच्या टोकाला ख्रिचन लोकांची स्मशान भूमी स्पष्ट दिसत होती. झाडाच्या पुढे केवळ १०-१५ मीटर जाताच ते दृष्य विरून गेले. मला अगोदरच उशीर झालेला असल्याने मनात फक्त लवकरात लवकर घरी पोचून आईला जेवण वाढून देण्याचा विचार होता आणि मलाही भूक लागली होती. कदाचित त्यामुळेच नजर उजव्या बाजूला असली तरी स्टेअरिंग वरचे हात डाव्या बाजूलाच फिरले आणि मी घरी पोचलो.

संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी थोडसं जॉगिंग साठी बाहेर पडलो. झाडाजवळ पोचताच दुपारच्या प्रसंगाची आठवण झाली. तिथून स्मशानभूमी १५० मीटरवर असावी पण मधल्या टेकडीवर असलेल्या झाडाझुडपांच्या गर्दीमुळे पलीकडची स्मशान भूमी काही दिसणं अशक्य होतं. तसेच तिकडे जाणारा रस्ता सोडाच पण साधी पायवाटही नव्हती.

मला दुपारी जे काही दिसलं तो निव्वळ भास असावा किंवा गाडीच्या काचेमुळे झालेलं रिफ्लेक्शन वगैरे असावं असा विचार करून मी तो विषय सोडून दिला. पण अजूनही दुपारच्या वेळी तिथून गाडीने कधीतरी येत असलो तर मनात विचार येतो की त्या दिवशी मी जर चुकून उजव्या बाजूच्या रस्त्याला गाडी वळविली असती तर?

४. अदृष्य पाठलाग

Chaseगोष्ट २०१० ची असावी. तेव्हां मी इग्लंडच्या बोल्टन शहरात राहत होतो. मी व माझी पत्नी नुकतेच रात्रीचं जेवण आटोपून वरच्या मजल्यावर टीव्ही पाहत बसलो होतो. काही वेळाने मला एक प्रकारचा वास यायला सुरुवात झाली. अगदी अस्सल मालवणी चिकनचा. मी मान आजूबाजूला फिरवली तर क्षणभर वास बंद होऊन पुन्हा सुरु व्हायचा. मला असं वाटू लागलं की तो वास अगदी अगरबत्तीच्या धुराप्रमाणे वळवळत माझ्या नाकाच्या दिशेनेच हालचाल करत होता. मी उठून बाथरुमला गेलो तर तिथेही माझ्या मागून वास येऊन नाकात घुसतोय असं वाटू लागलं. पुन्हा मी बेडरुमला आलो तर वास माझ्या पाठलागावरच होता. ह प्रकार एवढा विचित्र होता की शेवटी असह्य होऊन मी पत्नीला विचारलं “तुका कसलो वास येता काय गो?” तर ती बोलली की मघापासुन तिलाही चिकनचा वास येत होता परंतु केवळ माझा विश्वास बसणार नाही किंवा मी घाबरून जाईन म्हणून ती गप्प राहिली होती.

आमचं त्या दिवशीचं जेवण तर दहीभात केळी एवढंच होतं. खरं तर आम्ही गेली दोन वर्षांपासून मांस मच्छी खाण्याचं पूर्णपणे सोडून दिलं होतं. एवढंच काय पण गरम मसाल्याचा वापरही क्वचितच व्हायचा. थंडीचे दिवस असल्याने आजूबाजूला सर्वच घरांचे दरवाजे आणि खिडक्या पूर्ण बंद होत्या. प्रचंड थंडीमुळे तिथली घरं जवळपास एअर टाईटच बनवलेली असतात. आणि कहर म्हणजे आमच्या सभोवताली जवळपास १०० मीटरच्या परिघात फक्त गोऱ्या लोकांचीच घरं होती. तर या वासाचा उगम कुठे असावा? असे अनेक विचार भराभर मनात येऊन गेले. जवळ जवळ दीड तास त्या वासाने हैराण केलं आणि आम्ही दोघेही पूर्ण हतबल झालो होतो. तेवढ्यात अचानक कोणतीही विचित्र घटना न घडता तो वास गेल्याची आम्हाला एकदमच जाणीव झाली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
कोणताही तर्क आणि स्पष्टीकरण लागू न पडणारा हा माझा एकमेव वैयक्तिक अनुभव!

५. अंघोळ

Shower bath at 2amमाझी पत्नी आणि मेव्हणी दोघीही नर्स आहेत. पुढील घटना माझ्या मेव्हणीने सांगितलेली आहे. नर्सिंग शिकण्याच्या काळात ती मुंबईतील एका हॉस्पिटलच्या नर्सेस हॉस्टेल मध्ये राहायची. हॉस्टेलच्या साधारण रचने प्रमाणेच मधल्या लांबलचक कोरीडोरच्या दोन्ही बाजूला रूम्स आणि शेवटी कॉमन बाथरूम हेते.

हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काही नर्सेसचा हा अनुभव आहे. रात्री १-२ च्या दरम्यान जर कुणी बाथरुमला गेलं तर कोणत्यातरी एका बाथरूम मध्ये शॉवर खाली अंघोळ चालू असल्याचा आवाज येत असे. “कोण आहे?” असं विचारलं किंवा दरवाजा वाजवला तर शॉवर बंद व्हायचा. काही वेळाने दरवाजाही उघडा दिसायचा परंतु आत कोण होतं हे कधीच कुणाला कळलं नाही न कधी कोरीडोरमधून जाताना कुणी दिसलं.

नर्सेसच्या अनेक बॅचेस तिथे येऊन गेल्या पण रात्री दोन वाजता अंघोळ कोण करायचं हे गुपित तसंच राहिलं.

६. सोबत

Sobat - Colleagueमाझी पत्नी नुकतच तिचं शिक्षण संपउन मुंबईतच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीला लागली होती. काही दिवसांसाठी तिला तिसऱ्या मजल्यावरच्या एका वॉर्ड मध्ये नाईट ड्यूटी करायची होती. रात्री ड्यूटीला गेल्यावर तिच्या लक्षात आलं की वॉर्ड खूप मोठा असला तरी तिथे फक्त आठच पेशंट होते आणि त्या रात्री तर तिला एकटीलाच वॉर्ड सांभाळायचा होता. पहिले दोन राउंड संपले तेंव्हा रात्रीचे १२ वाजून गेले होते. बहुतेक सर्व कामं पण आटोपली होती त्यामुळेच कदाचित वॉर्डमधील भयाण शांतता आता जाणउ लागली होती आणि तो वॉर्डही तसा एका बाजूलाच होता. सहज तिच्या मनात विचार आला की कुणीतरी सोबतीला असायला हवं होतं. काही वेळ असा विचार करत ती पुन्हा एक राउंड मारून आली तर तिच्या टेबलाजवळ एक नर्स उभी होती. तिला ते पाहून आनंद झाला आणि तिने तिला नाव आणि कोणता वॉर्ड असं विचारलं; तर ती आपलं नाव सुशीला म्हणाली आणि पलीकडच्या वॉर्डमधून तिच्या सोबतीला पाठवल्याच बोलली. नंतरचा काही वेळ तिच्या सोबत चांगला गेला. सकळी ५ च्या दरम्यान सुशीला पुन्हा तिच्या वॉर्ड मध्ये जाण्यासाठी निघाली. नंतर काही वेळाने माझी पत्नीही ड्युटी संपउन घरी आली.

रात्री पुन्हा ड्युटीवर जाताना ती अगोदर पलीकडच्या वॉर्डमध्ये तिथल्या इनचार्जला थ्यांक्यू बोलण्यासाठी गेली. तिने सर्व काही ऐकून घेतलं आणि – नो प्रॉब्लेम, यु आर वेलकम – असं काहीसं बोलली. नंतर नेहमीच्या कामात दिवस तसे चांगले जात होते. पुढे बऱ्याच दिवसांनी तिला अन्य काही नर्सेस कडून कळलं की नर्स सुशीला त्याच वॉर्डमध्ये काम करायची आणि तिला मरून बरीच वर्षे झाली होती. सुशीलाच्या सोबतीचा अनुभव अन्य काही नर्सेसनीही घेतला होता परंतु त्या वॉर्डमध्ये नवीनच ड्युटीवर जाणाऱ्या नर्सला लगेचच हे सत्य सांगून भय निर्माण केला जात नसे. आणि म्हणूनच तिकडच्या इनचार्जने विशेष काही न बोलता तिची बोळवण केली होती.

७. GB नर्सिंग होमची लिफ्ट

Ghostly liftमाझी पत्नी आणि मेव्हणी इंग्लंड मध्ये गेल्यावर सुरुवातीला बोल्टन शहरातील GB नावाच्या नर्सिंग होम मध्ये एकत्रच काम करत होत्या आणि नवीनच असल्याने तिथेच तिसऱ्या मजल्यावर त्यांची राहण्याची सोय केलेली होती. अन्य स्टाफ घरूनच येजा करत असे. पुढे त्या दोघींना त्या नर्सिंग होम मध्ये आलेले काही अनुभव दिले आहेत.

तिकडे नर्सिंग होम मध्ये सहसा कायमचं अंथरूण पकडलेले – मरणाच्या दारात असलेले असे पेशंट्स असतात. खालच्या दोन मजल्यांवर ऑफिस आणि पेशंट्स साठीचे रूम्स होते. तिथली लिफ्ट अगदी क्वचित पेशंटला वर खाली नेण्यासाठी वापरली जायची अन्यथा या दोघीं शिवाय लिफ्ट कुणीच वापरत नसे कारण आतला जिना इतरांना जास्त सोयीस्कर होता.

पहिल्या काही दिवसातच एक विचित्र गोष्ट दोघींच्याही लक्षात आली. रात्री १२-१ नंतर पहाटेपर्यंत लिफ्टचा खेळ सुरु असायचा. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडला की पावलांचा आवाज यायचा आणि थोड्या वेळाने लिफ्ट पुन्हा खाली जायची. एखाद्या रात्री हा प्रकार ३-४ वेळा ही व्हायचा. सुरुवातीला नाईट ड्युटी नसताना कुणी एक जण झोपलेली असली तर आपली बहीण आली असावी असे समजून दरवाजा उघडायची. एखाद्या रात्री दोघीही रूमवर असताना हा प्रकार व्हायचा आणि ती दरवाजा उघडून पहायची. समोर कुणीच दिसत नसे. या आणि बऱ्याच अशा घटनांकडे दुर्लक्ष करून दोघींनी तिथे सहा महिने कसेतरी काढले आणि नंतर राहण्यासाठी दुसऱ्या जागेत गेल्या.

८. खोडकर मुले

Naughty Kidsत्याच GB नर्सिंग होम मध्ये ज्यूली नावाची एक पेशंट एडमिट होती. वय वर्षे ९३. एकदा जर तिला एका स्थितीत झोपवलं तर पुन्हा तिला अटेंड करेपर्यंत ती त्याच अवस्थेत पडून असायची. तिला स्वत:चे हात-पाय सुद्धा हलवता येत नसत.

संध्याकाळी ८ वाजता जेवण – औषधे इत्यादी आटोपल्यावर तिचं पांघरूण बदलताना ती नर्स जवळ रोज एकच तक्रार करायची. “प्लीज ते पांघरूण व्यवस्थित घालून जा, ती मुलं फारच खोडकर आहेत, जिन्यावर धावत रहातात आणि रोज माझं पांघरूण काढून नेतात.” नर्स ओके, ओके असं म्हणून आपलं काम करून जायची.

आश्चर्याची गोष्ट एवढीच की रोज सकाळी ड्युटीवर आलेल्या नर्सला तिचं पांघरूण रुमच्या दुसऱ्या टोकाला अस्ताव्यस्त पडलेलं मिळायचं आणि रॅक वरची औषधे किंवा अन्य समान इकडे तिकडे पडलेलं असायचं. ज्यूली आल्या दिवसापासून वर जाईपर्यंत हा कार्यक्रम तिथे रोजच चालू असयचा आणि स्टाफ सुद्धा न चुकता नित्याची कामं करत रहायचा.

९. माझी आई आली का?

mum - take me with youGB नर्सिंग होम मध्ये आणखी एक पेशंट होता – क्रिस – वय वर्षे ९८. त्याला सर्व्हिस देण्यासाठी २-३ माणसं लागायची त्या खेरीज त्याचा तसा त्रास कधीच नसायचा. फक्त सकाळी नाश्त्याच्या वेळी रोज एकच प्रष्ण – “माझी आई मला न्यायला येणार होती ती आली आहे का?” मग “नाही” असं म्हटल्यावर नाराज व्हयचा. “व्हेअर आर यू मॉम, टेक मी होम” एवढचं वाक्य बोलायचा.

काही दिवस तसेच गेले. एके दिवशी हा कार्यक्रम असाच चालू होता शेवटी तो नेहमी प्रमाणे बोलला “व्हेअर आर यू मॉम, टेक मी होम”. एक दोन मिनिटांनी तो पुन्हा बोलला “माय मॉम इज कमिंग, माय मॉम इज कमिंग”

काही वेळ शांततेत गेला – कुणी काहीच बोललं नाही. सर्वजण आपापल्या कामात गर्क होते. अचानक खोलीतली एक खिडकी धडकन उघडली गेली आणि एक जोरदार थंड हवेची लहर आत आली. खोलीतल्या सर्वांच्याच अंगावर काटा आला. पुढे काय होणार आहे त्याची कल्पना त्या अनुभवी स्टाफला आली होती. पुन्हा एकदा क्रिसने आपले दोन्ही हात वर उचलले आणि लहान मुलाप्रमाणे ओरडला “मॉम, आय वॉज वेटिंग फॉर यु, आय वॉज वेटिंग फॉर यु, यु टुक सो लोंग, टेक मी विथ यु नाव” आणि पुढच्या क्षणी त्याने मान टाकली.

जणू काही घडलच नाही अशा प्रकारे सर्वजण पुन्हा कामात गढून गेले.

१०. यमदुताचे आगमन

Yamdootमृत्यूची चाहूल मरणाऱ्या माणसाला लागो न लागो पण तिथल्या ड्युटी वरच्या बहुतेक नर्सेसना मात्र यमदुताचे दर्शन एकदा तरी घडतेच. याच GB नर्सिंग होम मध्ये काम करताना माझ्या पत्नीला हा अनुभव सलग दोन दिवस आला.

नुकत्याच अॅडमिट झालेल्या एका पेशंटच्या ड्युटीवर असताना तिला त्या खोलीत दोन तीन वेळा बाजूलाच एक काळी सावली असल्याचा भास झाला. काम आटोपून खोलीच्या बाहेर पडताना तर ती सावली पेशंटच्या डोक्याजवळ उभी असल्या सारखी वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी समजलं की तो पेशंट रात्री झोपेतच गेला.

दुसऱ्याच दिवशी आणखी एका पेशंटच्या बाबतीत असाच अनुभव आला. त्या खोलीतून बाहेर पडताना तिला अगोदरच समजलं होतं की या पेशंटला उद्याचा दिवस काही दिसणार नाही.

त्या नर्सिंग होमच्या बहुतेक सर्वच नर्सेसना असा अनुभव एकदातरी आलेला होता कारण तिथे मरणाच्या दारात असलेलेच पेशंट असायचे.

भूतावळ – top 10 close encounters