असं म्हणतात की प्रत्येकाला स्वताच नशीब घडवण्याची संधी परमेश्वर देत असतो. पण दुर्दैवाने झाडांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट मुळीच खरी वाटत नाही. आरडा ओरड करून आपल्या वेदना सांगू न शकणारी आणि कुठेही पळून न जाऊ शकणारी झाडं आयतीच माणसाच्या तावडीत सापडली आहेत. छोट्या मोठ्या झाडा झुडपां पासून ते अगदी महाकाय वृक्षां पर्यंत, त्यांच्या जन्मा पसून ते शेवटच्या अंशापर्यंत माणूसच त्यांचा ललाट लेख लिहितो. आणि हे अगदी अनादी काळापासून चालूच आहे.

trees-mans-best-friendsगरीब बिचारी झाडं सुपीक जमिनीत, डोंगर दरी, बर्फ असो की वाळवंट कुठेही जन्माला आली तरी कुणालाही तिळमात्र त्रास न देता स्वताचं आयुष्य जगत असतात. थंडी, वारा, पाऊस असो की उन, एकाच जागेवर आयुष्यभर उभी राहतात. विलक्षण गोष्ट म्हणजे आपणच आपलं अन्न तयार करतात आणि इतर पशु पक्ष्यांना सुद्धा अन्न आणि निवारा देतात. माणूस नावाचा प्राणी सोडल्यास इतर सर्वजण निसर्ग चक्रानुसारच जीवन व्यतीत करत असतात.

इतर प्राण्यांच्या उलट माणूस मात्र झाडां कडून सर्व काही अरेरावीने वसूल करून घेतोच आणि तरीही त्यांच्या पिळवणुकीला सदैव तयारच असतो. आपल्याच मस्तीत जगणाऱ्या झाडासमोर अचानक काही माणसं येतात आणि ठरवतात की हे जळणासाठी, हे फर्निचरसाठी, रस्त्याच्या जागेसाठी, हे घरासाठी, हे कागदासाठी आणि हे माणसाला जाळण्यासाठी योग्य झाड आहे म्हणून ते तोडा. वर आणि असं करताना माणसाला वाटत असतं की आपण झाडाचा योग्य प्रकारेच वापर करत आहोत.

जळणासाठीच्या झाडांना धर्म शास्त्राप्रमाणे कदाचित लगेचच मुक्ती मिळत असेल.

फर्निचरच्या आणि घरासाठीच्या झाडांना मात्र दुर्दैवाने माणसाच्याच सहवासात राहून पिढ्यान पिढ्या मुक्तीसाठी ताटकळत रहाव लागतं. सर्वात विचित्र अवस्था कागदाच्या झाडांची! कापाकापी करून झाल्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया मधून जाताना त्याच्या नरकयातनेच्या प्रवासाला सुरुवात होते. काही दिवसात झाडाचं रुपांतर पसरट पातळ पांढऱ्या चौकोनी तुकड्यांच्या ढिगात होतं. मग माणूस त्याच्यावर काहीबाही लिहितो वगैरे, वगैरे पण बहुतेकदा त्याचा चोळामोळा करून कोपऱ्यात फेकतो. सरस्वतीच्या रुपात वह्या – पुस्तकं – वर्तमानपत्रे तयार होतात पण कालांतराने त्याचं रुपांतर रद्धीत होऊन त्यात चणे-शेगदाणे-वडे-भजी वगैरेच्या पुड्या बांधल्या जातात.  लक्ष्मीच्या रुपात नोटा छापल्या जातात परंतु चांगल्या कामापासून ते अतिशय नीच कामाचा मोबदला म्हणून माणूस याच कागदाच्या नोटांचा वापर करतो. तर काही लोक या कागदावर कायदा लिहितात की कागद बनवण्यासाठी हीच झाडं तोडावीत.

paper-shredderमग एक दिवस ही सर्व रद्दी पुन्हा कारखान्यात पोचते आणि त्यापासून जरा जाडसर कागद बनतो. आता त्याचा वापर अगदी  टोयलेट पेपर पासून ते अन्न / भेटवस्तू वगैरेच्या प्याकिंगसाठी होतो. पण प्याकिंग उघडल्यावर पुन्हा तो कागद कोपऱ्यातच जातो. काही कागदांवर पुन्हा कायदे लिहिले जातात, तोडा, थोडीच तोडा वगैरे. तर काहींवर महत्वाची गुपितं लिहून लोखंडी पेट्यात ठेवली जातात. मग एक दिवस ही सर्व गुपितं श्रेडर नावाच्या यंत्रातून पार चिंधड्या उडे पर्यंत फिरवली जातात. त्या नंतर ती गुपितं इतरांच्या हाती लागू नयेत म्हणून जाळली जातात तेव्हां कुठे त्या झाडाचा नरक संपत असेल. पण इतर कागदांचा सहजासहजी नाही, कारखाना-दुकान-माणूस हा फेरा सतत सुरूच राहतो आणि दर वेळेला नवीन स्वरुपात येऊनही माणसाचे अत्याचार सहन करावे लागतात.

या माणसाने बेबंदपणे झाडांची कत्तल करून सर्व पृथ्वी वासीयांच्या अस्तित्वावरच संकट आणलेलं आहे. पण आता अनेक शतकां नंतर काही माणसांना एवढं तरी सुचलं की १० झाडं तोडल्यावर निदान एखादं तरी नवीन लावावं. पण ते जगवण्यासाठी सुध्दा कसून प्रयत्न होतीलच याची खात्री कोण देणार? तुम्ही घ्याल का याची थोडीशी जबाबदारी?

गरीब बिचाऱ्या झाडाला