कोकण आणि जत्रा असं अतूट नातं आहे.
कोकण आणि जात्रा असं अतूट नातं आहे.

जत्रा

आता भरनत नाय जात्रा पयल्यासारखे…
दिवस्याढवळ्या लॉक पाया पडान जातत…
रीतभात नी वरगणीसाठी जात्रांची नाटका…
टीवी वयलेच कार्यक्रम टायमपास करतत.

तेवा ढोलांच्या कुडपार जात्रांच रगतात भरा…
गावाघरात मनापानात जात्राच जात्राच भरा…
साफसफाय देवळांची माटवबिटव घालीत…
पोशाखांनी दागिन्यांनी दॅवसुदा नटत
ढॉलसुदा गावकार तडक्यान बडैत…

लालांबचे दुकानदार जागेसाठी झटत…
देवापुढे रास पडा तांदळानाळरांची…
वळेसार, उदबत्तींका जागाच उरा नाय…
नावसानी न्हावनानी मानकरी थकत…
नाटक उब्या रवासर जेवक सवड नाय…
तातांसाभर पालखी फिरा देवळाभोवतीनी
बनाटे नी भजना अवसार घुमत…

गणपती, संकासुर, बिलीमारो गेलो काय…
राजासाठी लॉका अगदी गपगार रवत…
लालांबसून झिलगे येयत जुगारबिगार खेळाक…
आंदारानी वायटबरी लपडी व्हयत…
गरमागरम चायभजी दिता घेताना…
वळखीनी लगनाचे वळेसार खोयत…

खेळनी, पेपारी नी फुग्यांची फाटढुम…
खाजा, लाडू, वळेसार, झिलकीक रवा नाय…
धाकट्यापासून थॉरापरयात सगळेच नटत…
पैसोआडको सकाळी हाती रवा नाय…

आता पैसोआडको खेळता डिशबिझ यिले…
सीडीवर दशावतार खोलयेत मावता…
वरगणी दिली काय जबाबदारी सोपली…
बापुडवानो देवसुदा गपगप रवता.

स्पिकरबिकर वाजलो काय जात्रेचा कळता…
घरचा कोनय यॅकदोन ओटी भरुन यॅता…
पयल्यासारा रगात आता हुळहुळना नाय…
तरी जत्रा आजून तश्शी तश्शीच मनात भरता.

_ प्रा. नामदेव गवळी, वैभववाडी.

Latest posts by namdevg (see all)
जात्रा
Tagged on: