कोल्हापूरहून घाट उतरल्यावर सर्वात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे घाटातून दिसणारे गर्द हिरव्या वनराईतील कोकण व त्यामधील वळणावळणाचे रस्ते आणि तिथली भाषा. फोंडा, गगनबावडा या भागावार कोल्हापूरी वळणाची थोडी छाप जाणवते. तर दोडामार्ग, बांदा यावर गोव्याची छाप दिसते. खारेपाटण  परिसरात राजापूरमधील बोलीभषेची छाप जाणवते. असे असले तरी सिंधुदुर्गातही मालवणी भाषेची वळणे थोड्या थोड्या अंतराने बदलतात. नोकरीच्या निमित्ताने जिल्ह्यात बदलीच्या गावी आम्ही तसे फिरलो, तशी तेथील वेगवेगळी भाषा आमच्या तोंडी बसत गेली.

सावंतवाडी, वेंगुर्ला यामधील काही  भागात भाषेचा फरक चटकन लक्षात येतो. उदा. एखाद्या पाहुण्याला राहणार की जाणार हे विचारण्याची त्यांची पद्धत ‘रवतल्यात काय जाताल्यात ‘  अशा वळणाची दिसते. तर वेंगुर्ला येथे हेच विचरयचे असल्यास ‘रवतलास मरे ‘ असे विचारले जाईल. कणकवलीच्या काही भागात ‘रवास नाय ‘ असे विचारले जाते. मालवण भागात ‘रवतालास काय जातालास ‘ असे विचारले जाते. अशी थोड्या फार फरकाने बदलणारी भाषा आढळते.

माझे बालपण, कोकण आणि माझा गाव

माझे बालपण बहुतांशी वेंगुर्ल्यात गेल्यामुळे तेथील काही चालीरीती माझ्या अंगळाणी पडलेल्या होत्या. उदा. आम्ही मामाला ‘रे मामा ‘ म्हणायचो. पण माझ्या गावी आंब्रडला माझे चुलतभाऊ ‘अहो मामा ‘ म्हणूनच हाक मारायचे. वेंगुर्ल्यात शेतीसाठी ‘कुणगे ‘ व गवताची ‘कुडी ‘ म्हणायचे, तर आंब्रडला शेतीचे ‘कोपरे ‘ व गवताची ‘तणस ‘ हे नवीन शब्द मला समजले. वेंगुर्ल्यामध्ये समुद्राच्या माशांव्यतिरिक्त शेतीतले व नदीतले मासे बघायलाही मिळायचे नाहीत. मात्र आंब्रडला आल्यावर चढणीचे व उतरणीचे मासे, त्यामध्ये खवळे, ठिगूर, डेकळे अशी वेगवेगळी नावे, त्यामधील फरक ओळखायला मी शिकलो. मासे मारण्याच्या पद्धतीही फार जवळून बघितल्या. रात्रीच्या वेळेला गॅसबत्ती घेवून शेलूक व कोयती यांचा वापर करणारे तर ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात उतरणीच्या माशांसाठी शेतातल्या पाण्याच्या ओतात डोमी तर नदीवर कीव घालून, खून वापरुन मासे पकडणे इतकेच काय तर मोठ्या पाण्यामध्ये एंडीचा वापर करुन जाळ्यांत मासे पकडणे हे सगळे प्रकार अनुभवले.

मोफत मिळणार्‍या या पाणमेव्यावर सगळ्याच लोकांचा डोळा असतो. त्यामुळे फुकटे बघे लोक आजूबाजूला जमा होण्यापूर्वी थोडे मासे लपवत लपवत घरी पाठवून देणे आणि शेवटच्या गाळाचे वाटप करुन आलेल्या सगळ्यांना भागवणे ही कला सगळ्यांनाच अवगत असते. एवढे असले तरी वाडीवरच्या एखाद्या घरात म्हातार्‍या-म्हातारीसाठी न चुकता ते मासे देणे हा प्रकारही इथे बघायला मिळतो. मासे किती मिळाले हे भात मोजायच्या मापाने म्हणजे ‘कुडू ‘ या हिशोबात सांगण्याची पद्धत मला याच गावात येवून समजली.

माझ्या लहानपणी मी आंब्रडला घरी यायचे म्हणजे फार खुशित असायचो. वेगळे वातावरण, वेगळी माणसे, नदी, जंगल हा भाग फार आकर्षित करायचा. आमच्या जुन्या मातीच्या घरात चतुर्थीला पावसाळ्यात चारही बाजूने गच्च जंगल वाढलेले असायचे. पायर्‍यांवर सुकलेले रानगवत टाकायचे. घसरायला होऊ नये हा त्यामागचा उद्देश असायचा. दोन बांबूच्या काठ्या मधोमध दोन भाग करुन त्यात हेच गवत भरुन छपराला पावसासाठी बांधलेले असायचे. त्याला ‘झडी’ म्हणतात. पावसाची झड भिंतीवर येऊ नये म्हणून.

कोकण आणि गावातली घरे

आमच्या काकांच्या घरात पडवीतच एक यू आकारात नैसर्गिकरित्या वळलेला बांबू कापून टांगलेला असायचा. शेतीची कामे करताना भिजलेली घोंगडी वाळवण्याकरिता त्याचा उपयोग व्हायचा.घराच्या माळ्यावर जाड फळ्या व त्यामध्ये कोकमापासून आमसोल बनवण्याकरिता लाकडी भांडे (मांड) होती. एका खोलीमध्ये जमिनीत दगडी खोलगट भांडे बसवलेले होते. त्याला ‘व्हायन ‘ म्हणतात. त्यामध्ये धान्य सडून (भात) घेतले जायचे. भिंतीला टेकलेली एक मोठी लाकडी घिरट होती. दोन मोठी लाकडी चाके एकमेकांवर ठेवून त्यातून धान्य भरडून घेतले जायचे. त्या काळी गिरणी नव्हत्या. तेव्हा सर्व घरात याच वस्तूंचा वापर भातपासून तांदूळ करण्या करीता व्हायचा.

याव्यतिरिक्त बांबूंच्या काठांचा वापर करुन केलेल्या वस्तू प्रत्येकाच्या घरात आजही दिसतात. टोपली, तांदूळ धुण्यासाठी रवळी, भात सुकवण्यासाठी डाळी, आंघोळ करताना आडोश्यासाठी याच बांबूच्या जाळीला ‘तटकी ‘ म्हणायचे, इ. लावले जायचे. भिंतीला लाकडी खुंट्या असायच्या. त्यावेळी मातीच्या वस्तूंना फार महत्त्व होते. आमची आई सांगायची की आमच्या आजीच्या संसारात बहुतेक सगळी भांडी मातीचीच होती. मला आठवतं की आमच्या घरात एक दगडी होती. म्हणजे दगडी भांडे, आजोबा त्यातूनच पेज जेवायचे. एक मोठा दगडी घाटणा होता. नळे असलेल्या या घरात भरदुपारी सारवलेल्या शेणाच्या जमिनीवर एखाद दुसर्‍या फटीमधून सूर्यप्रकाश आत यायचा. फुटलेल्या काचीच्या कप-बश्यांचे बारीक तुकडे जमिनीत चिकटवून नक्षी बनवलेली असायची.

कोकण माझ्या आठवणीतलं
कोकणातील शेतकरी – पावसाळ्याची पूर्व तयारी करताना.

मागच्या बाजूला न्हाणीघर. तिथे कायम गरम पाणी करण्यासाठी काळंठीक्कर पडलेलं मोठं मातीचं मडकं. त्यावर लाकडी फळीचं झाकण. बाजूच्या उभ्या काठीवर अ‍ॅल्युमिनीअमचा तांब्या. न्हाणीमध्ये मोठा काळा दगड. त्याला ‘फातर ‘ म्हणतात. नदीमध्ये बायका अशाच दगडावर कपडे धूतात. भिंतीमध्ये छोटे मातीचे भांडे बसवलेले असायचे. सुट्टे पैसे, विड्या, सुपारी, माचीस त्यात टाकून ठेवली जायची. जेवणाच्या खोलीत अ‍ॅल्युमिनीअम व पितळीच्या भांड्याबरोबर लाकडी पीठ मळायची काठवट व काही मातीची भांडी असायची. पेज वाढण्यासाठी नारळाच्या करवंटीला बांबूची काठी बसवून ‘डवली ‘ बनवली जायची. एका कोपर्‍यात वाटप करण्यासाठी दगडी पाटा व वरवंटा ठेवलेला असायचा. काळोखाच्या खोलीत एका कोपर्‍यात कुर्‍हाड, कोयते, भात कापायच्या कोयत्या, जपून ठेवलेली ठासणीची बंदूक व पुरातन काळातील तलवार.

कोकणातील शेतकरी

बाहेर ओसरीवर पायरीच्या उंचवट्याला कांबळे अंथरुन बाजूला पानाची चंची घेऊन काका झोपलेले असायचे. त्यांचं पावसात भिजलेलं चामड्याचं चप्पल उभं करुन ठेवलेलं असायचं. बारीक भोक पडलेल छोट धोतर (पंचा) नेसून तोंडात पान घेऊन पडलेले असायचे.

पाणी घेऊन येणारी नऊवारी नेसलेली काकी. पाण्यासाठीही मातीची भांडी. दोन्ही बाजूला वाढलेल्या भातातून असलेल्या वाटेवरुन येत असते. विहीरीला रहाट नाही. लाकडी जाड बार वाकलेला असे. त्यावर पाय देऊन पाणी काढायचे. त्याला “फापाळे” म्हणतात.

कोकणातल्या पध्द्तीप्रमाणे वळयीत कोपर्‍यात देवघर होतं. देवघरात दोन न सोललेले नारळ व इतर मुर्त्या होत्या. धूप पेटवून तिथे कायम सुरेख भावपुर्ण वातावरण असायचे.

मागच्या बाजूला गोठा. त्यामध्ये दावणीला बांधलेली जनावरे, लहान गोंडस गाईचे पाडस, त्यांच्यासाठी काकीने कापून आणलेले गवत मोठ्या बांबूच्या टोपलीत ठेवलेले असायचं, त्याला “झाप” म्हणतात. मागील परसात गवताची गंजी म्हणजे “तनस” गवत ओढून त्याला छान आकार मिळालेला असायचा. मागच्या माळ्यावर शेतीची अवजारे नांगर, जू वगैरे ठेवलेले असायचे.

कोकण माझ्या आठवणीतलं २
कोकणात कोसळणाऱ्या पावसात उघडीप मिळते तेव्हां.

एकंदरीत बाहेर पाऊस व न्हाणी घरात पेटलेली आग गरम गरम पाणी. यामुळे एक उबदारपणा जाणवायचा भिंतीच्या लाकडी नक्षीच्या खिडकीतून मागच जंगल कीर्र वाटायच. नदीच्या पाण्याचा रात्री आवाज यायचा, जंगलात चित्र विचित्र आवाज येत असायचे. रात्री आजीच्या गोधडीत आम्ही दिवस भर दमलेले कधी झोपी जायचो समजायचेही नाही.

आता काळ बदलला स्लॅबची घरे, शेती बंद, गुरे नाहीत. रस्त्या सतत मुळे गाड्यांचे आवाज यामुळे पुर्वीचे वातावरण आणि कोकण आता जसेच्या तसे नसले तरी थोडे फार राहीले आहे. हे ही नसे थोडके.

….सना

कोकण माझ्या आठवणीतलं
Tagged on: