जवळ जवळ दोन वर्षांनी पुन्हा भारत भेटीचा योग आला. यावेळी मात्र माझा मुख्य कार्यक्रम होता – कोकण दर्शन. मी, माझी पत्नी, माझी मेव्हुणी, तिचा नवरा व मुलगा असे पाचजण यु.के. हून ३ नोव्हेंबरला रात्री उशिराने बाहेर पडलो. यावेळी दुबईला मेव्हण्याकडे चार दिवसांचा मुक्काम होता. ४ तारीखला सकाळी ८ च्या दरम्यान दुबईत पोचलो. तिथे आमच्या अगोदरच माझी मुंबईकर मेव्हुणी सहकुटुंब पोचलेली होती. नोव्हेंबरमध्ये दुबईची गरमी विशेष जाणवत नाही त्यामुळे दुपारी १२ पासूनच दुबई फिरायला सुरुवात झाली. तीन मुलं, पाच बायका व चार पुरुष, शॉपिंगला किंवा फिरायला  जायचं तर एवढा घोळ असायचा की त्यात बराच वेळ वाया जात असे. शेवटी सर्वानांच चार दिवस अपुरे वाटले. सात तरीखला रात्री १०.३० चं फ्लाईट होतं पण संध्याकाळचे सात वाजले तरी काहीजण शॉपिंग हून परतले नव्हते. पुढच्या वेळी नोव्हेंबर/डिसेंबर मध्येच जायचं व एक आठवडा तरी मुक्काम करायचा असं वाटू लागलं.

Konkan Darshan day one 

from Kharghar to Alibag to Harihareshwar in Raigad district.

https://www.facebook.com/media/set/?set=a.1458677154146927.1073741831.351758361505484&type=1&l=10c6b83cd2

प्रवासास आवश्यक समान खरेदी करा अमेझॉन वर

८ तरीखला पहाटे चार वाजता मुंबईला पोचलो. मुंबई मला मुळीच आवडत नाही त्यामुळे दुसरे दिवशीच मी बहिणीकडे खारघरला सटकलो. पाच दिवस मस्त पत्रावळी झाल्या. खारघर सेक्टर १० म्हणजे नुसतचं सीमेंटच जंगल, चालायला धड रस्ता पण नाही त्या मुळे बाहेर पडलोच नाही. बऱ्याच वर्षांनी एक छान मराठी सिनेमा पहिला – देऊळ.

शेवटी १४ तरीखला माझ्या कोकण दर्शन यात्रेला मुहूर्त मिळाला. अलिबाग ते गोवा असा एकूण १०-१२ दिवसाचा बेत होता त्यामुळे कुणीच माझ्या बरोबर यायला तयार होईना. त्यामुळे एकंदरीत भारतातील ट्राफिक, ड्रायव्हिंग आणि दीर्घ प्रवास यांचा विचार करता सेल्फ ड्राईव्ह कॅन्सल करून मी खारघर हून एक छोटीशी गाडी ड्रायव्हर सहित भाड्याने घेतली. सकाळी ११ च्या सुमारास खारघर हून निघालो.

NH17 ला येई पर्यंत बराच वेळ निघून गेला. अगदी NH17 सहित सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे आणि त्यात कहर म्हणजे जागोजागी होणारी टोल वसुली (कशासाठी???) यामुळे कासवाच्या गतीने वाहने सरकत होती. शेवटी हायवे सोडल्यावर थोडा चांगला रस्ता मिळाला आणि दुपारी दोनच्या दरम्यान अलिबागला आलो. समोर समुद्र दिसल्यावर आता खऱ्या अर्थाने कोकण दर्शनला सुरुवात झाली असं वाटू लागलं.

कोकण दर्शन : अलिबाग

निळा सागर निळ्या आकाशाला भेटतो जिथे, निसर्गाने पसरलेला हिरवागार गालीचा जिथे, तांबड्या लाल दगडाची घरं जिथे, आंबा काजू माडा पोफळीच्या बनात वसलेलं कोकण मला पहायचं होतं.

यापूर्वी NH17 च्या आसपास येणारी पर्यटन स्थळे काही अंशी पाहून झाली होती. मला आता फक्त अलिबागच्या पुढे किनारी मार्गाने गोव्याच्या दिशेने जायचं होतं, कॅमेऱ्याला साक्षी ठेऊन!!!

अलिबागचा किल्ला पहिला व थोड्यावेळाने तेथून निघालो. अलिबाग, नागाव, रेवदंडा, काशीद मार्गे हळू हळू काशीद पर्यंत आलो तर साडेचार वाजत आले होते. इथे समुद्रात बरेच जण उतरले होते. त्यांच्या सोबत काही वेळ निघून गेला. जवळच असलेले फणसाडचे अभयारण्य पाहण्यायेवढा वेळ नव्हता. किनाऱ्याने पुढे मुरुड व आगरादांडा ही रम्य गावं आहेत. एका बाजूला समुद्र तर दुसया बाजूला भातशेती, भात कापणी नंतरची कामं सुरु होती. पुढे दिघीचा समुद्र सुद्धा पाहण्या सारखा आहे. तिथून खरं तर दिवेआगर व श्रीवर्धन मार्गे हरिहरेश्वरला जायला हवं होत. पण आम्ही चुकून म्हसळा इथे आलो. बरीच सायंकाळ झाली होती त्यामुळे पुन्हा मागे जाण्यापेक्षा आम्ही हरिहरेश्वर इथे रात्रीचा मुक्काम करून सकाळी पुन्हा मागे येण्याचं ठरवलं. हरिहरेश्वर MTDC ला पोहोचे पर्यंत बराच काळोख झाला होता…….

कोकण दर्शन

|| इतिश्री कोंकण दर्शनं प्रथमोऽदिन समाप्त: ||
|| श्री परशुरामार्पणमस्तु ||

कोकण दर्शन डायरी १४-११-२०११
Tagged on: