बा देवा गांगेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी वेतोबाक आणि “समस्त सुरवर गणानां” तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्याक, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणान कोकणाविषयी थोडाफार लीवन malvani.com ची राखण रखवाली करूची विनंती करतय. म्हणा – होय महाराजा!!!

या साईटचा हेतू तुम्हाला कळला असेलच. प्रत्येक माणसाला जशी विचार करण्याची शक्ति (बरी जाव वायट जाव) दिलेली आहे (मी नाही, ^^ त्याने) तसेच थोडफार लिहिण्याचीसुद्दा शक्ति (पुन्हा बजावाजा) दिलेली असावी, फक्त आपण ती ओळखून त्याचा वापर करण्याची गरज असते. आता माझंच पहा, साईटचा विषय “कोकण”, साईटचं नाव “मालवणी”, मी लिहितोय मरठीत(??) आणि तरी सुद्धा तुम्ही हे वाचताय ना!!! तर मग लिहा, तुम्हीपण लिहा, वाचक भेटतीलच!!! “one can not be a writer all the time so one can not be a reader all the time” (कुणी नाही, मीच म्हटंलय ते), थोडक्यात, नेहमी लिहिणारे सुद्धा वाचतात तर सतत वाचणारे थोडं लिहू शकत नहीत?? कोणी सांगुचा कोणाच्या आगांत कोणाचो संचार जायत, I mean वपु-पुल-बाभ-प्रके वगैरे वगैरे. As long as it is nigadit with kokan, it will be published here.

२००१ मध्ये वेबसाइटच्या क्षेत्रात आलो तेव्हा पासूनच आपल्या बोलीभाषेत वाचकानां सुद्धा लिहिण्याची सोय असलेली साइट करण्याचं मनात होतं, लगेच domain register केला पण त्याकाळात computer क्षेत्रात भारतीय भाषांची अवस्था पानिपतात सापडल्या सारखी झाली होती. कुणाला कुणाचा मेळ नाही. अनेक कंपन्यांचे अनेक प्रोग्राम आणि पद्धती पण वाचकाला काही धड दिसेल याची खात्री नाहीच. मग युनिकोड आलं पण पुन्हा वाचकाचा computer त्यासाठी योग्य असण्याची गरज होती. मग ह्ळुहळू internet चा पसारा वाढला, computer ही स्वस्त झाले आणि माझ्या साइटला मुहूर्त मिळाला. मला वाटतं मधल्या काळात मनोगत.कॉम ने मात्र उल्लेखनीय कामगिरी केली.

प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहरात जसं हिंदी – इंग्रजी – मराठी – मालवणी मिक्स करून बोलतो तसंच लिहायला इथे फूल परवानगी आहे. “माऊसच्या क्लिक” ला “ऊंदरावर टिचकी” वगैरे सारखं क्लिष्टीकरण करुन वाचकानां भीतीदायक स्वप्नं पडणार नाहीत याची काळजी घेऊन लिहा आणि please, NO malvani xxx, फक्त जमेल तेव्हढं शूद्ध लेखन – व्याकरण ठेवण्याचा प्रयत्न करा. माझं सोडा, शाळेत – कुडाळकर बाई – उलट्या तळव्यावर – ऊभी पट्टी – दोन फटके द्यायची (उलट्या काळजाची…) तरीही केव्हा जमलं नाही तर आता कुठून? या साइटचं आवश्यक असलेलं इंग्रजीच मराठीकरण करतानासुद्धा कार्डोस सरांच्या आठवणीने सतत डोळे भरुन येत होते. साइटचा technical भाग पूर्ण केला पण पुढची मांडणी, हाताळणी वगैरे बाबत एवढ्या वर्षात काहीच विचार केला नव्हता. मग माई आणि भाई (आमच्या घरातले साहित्यिक) यानां गार्‍हाणं घातलं, माईने पुढे आपल्या मुलीकडे पास केलं आणि तिने दोनच दिवसात माझ्या मनासारखं लेआउट आणि शब्दांकन करून दिल. इस्रोत पीएचडी करतेय ती, Yes, मला तिचं प्रचंड कौतुक आहे. असो, एकूण सागांयच एवढच, साइट तर लाँच झाली, आता तुम्ही भरभरुन लिहावं आपल्या कोकणासाठी अगदी कोकणी माणसाच्या मनातलं!!!

नोकरीत वडिलांची दर ३-४ वर्षांनी गावोगावी बदली होत रहिल्याने माझी १२वी पूर्ण होईपर्यंत ७ शाळा बदलल्या होत्या आणि कदाचित त्यामुळेच मला तसे बाळपणीचे घनिष्ट मित्र नसावेत. जास्त काळ कुडाळ, वेंगुर्ला मग गोवा आणि पुन्हा कणकवली इथे गेला. सध्या मु.पो. England, Bolton. गेल्या ८ वर्षात फक्त २ मराठी फॅमिली भेटल्या, त्यांची भाषा इग्रंजाळलेली, २० वर्षांनंतर सहाजिकच. “ok bro, हा घर तुमी केवड्याला घेटला?” वगैरे ऐकायला मिळतं. ते मुळ खारेपाटण आणि बांदा इथले. अलिकडे आमचं मोठसं जाणं येणं होत नाही, कारण तेच – बिझी बिझी बिझी. इथे गुजराथी मात्र एव्हढे आहेत की इथूनच थोड्यानीं गुजरातला मायग्रेट केलं असावं अस वाटेल. आम्हाला गुजराथी “न थी आवडे” यावर त्यांचा विश्वासच नसतो, बहुतेकांचा समज आहे की ती भारताची राष्ट्रभाषा आहे आणि मराठी लोक ती मुद्दाम बोलत नाहीत. त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांची वागणूक चांगली असूनही उगाचच आपलं बीन बुलाये मेहमान असल्यासारखं वाटतं. त्यामुळे गुजराथी काय आणि गोरे काय, आमच्यात ठराविक अंतर राहिलच असं वाटतं.

my school mates from kudal high school kudal
कुडाळ हायस्कूल मधील माझे वर्ग मित्र

जवळ जवळ तीन वर्षांपूर्वीची गोष्ट, कुडाळहून प्रविणच पत्र आलं, त्यावरचा माझा पत्ता पहाता, कुडाळ ते बोल्ट्न असा यशस्वी प्रवास त्या पत्राने केला यावर अजून विश्वास बसत नाही. विषय होता – “१९७२-७३ या वर्षी कुडाळ हायस्कूल कुडाळ मध्ये ५वीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा” या साठीचे निमंत्रण. अगदी त्याच काळात मला मेव्हण्याच्या लग्नासाठी गोव्याला जायचं होतं. एवढ्या वर्षानीं सर्वांच्या भेटीचा योग किती छान जुळून येत होता. त्यानीं खरोखरच ते पत्र मनापासून पाठवलं म्हणून ते मला मिळालं येवढच मी म्हणू शकतो. मध्यंतरीच्या काळात जगताप आणि शेखर वगळता कुणाची भेटही झाली नव्हती. झालं, तो दिवसपण आला. बर्‍यापैकी उपस्थिती होती. काहीजण सहकुटुंब आले होते. बहुतेक जण कुडाळलाच स्थाईक असल्याने एकमेकाशी बर्‍यापैकी परिचित होते व त्यानींच तर सर्व घडऊन आणलं होतं. मला मात्र बहुतेक चेहरे आणि नावं ओळखणं तसं कठीण गेलं. अगदी पुन्हा ५वीच्या वर्गात गेल्या सारखे सभोवताली नवीन नवीन चेहरे. मी इग्लंडला की गडहिंग्लजला असा भाव सुद्धा एकदोन चेहर्‍यांवर होता. दिवसभराचा अतिशय सुंदर कार्यक्रम होता. मझ्या जीवनातला अजून एक अविस्मरणिय दिवस मला मिळाला. त्रिवार धन्यवाद. मला खूप बोलायचं होतं खूप ऐकायचही होतं पण मोठसं काही साध्य झालं नाही कारण मी मुळातच उशीरा पोचलो आणि मला परत वास्कोला जायचं असल्याने लवकर बाहेर पडावं लागलं. असो, राहिलेली कसर मला आता भरून काढायची आहे. खालच्या चित्रात हजर असलेल्या आणि नसलेल्या माझ्या वर्ग बंधू भगिनीनां या साइटव्दारे आपल्या उरलेल्या गजाली पुढे चालू ठेवण्यासाठी निमंत्रित करत आहे. प्रत्यक्ष भेटीचा योग येइल तेंव्हा भेटूच पण सध्यातरी दुधाची तहान ताकावर. आता मला आणखी काही लिहायचा कंटाळा आलाय पण परत नक्की असंच काहीतरी पांढर्‍यावर काळं करीन.

गांववाल्यांका नमस्कार