मी कोकणातलाच असलो तरी अगदी खेडे गावात वास्तव्य करण्याचा अनुभव मला नवीनच होता. इथे गणपतीत सर्वांच्याच घरी गर्दी असते आणि काय, कसे पासून इतरही अघळ पघळ गजाली होत असतात. गणपति गेले आणि गर्दी ओसरली. आमच्याही घरात फक्त मी आणि आई राहिलो होतो.

raucous-loudspeaker-malvani-days
सकाळ निदान भूपाळीने तरी सुरु व्हावी.

आता शेजारच्या घरातील बोलणं ही स्पष्ट ऐकू येऊ लागलं. बहुतेकदा सकाळी जाग येते ती कर्कश स्वरातील लाउड स्पीकर मुळे. भूपाळी मात्र कधीच ऐकू आली नाही. नाहीतर शेजाऱ्याच्या मंत्रोच्चाराने सकाळ झाल्याचे समजते. सकाळी बैल गोठ्यातून काढताना आणि संध्याकाळी परत आणताना नाना प्रकारच्या अस्सल मालवणी शिव्या ऐकून सर्वच गुरे निर्ढावलेली असावीत. “भय*** पाटी फिर म्हणतय तर तो आव*** पुढे जाताहा बघ कसो तो. तुका वाघान रे कसो नाय खाल्यान?” इथे काही गुराखी अशीच भाषा बोलतात. गुरे मात्र ऐकून न ऐकल्या सारखं स्वताला हवं तेच करतात.

अगदी या उलट शेजारीण! एकदा तिचा बैल सकाळी कुरणातच बसून राहिला तशी ही त्याच्या जवळ गेली आणि म्हणते कशी, “आज काय चराचा नाय हा? बसान काय रवलस? मका सवड नाय तुका चार कापून घालूक.” एकदा संध्याकाळी गोठ्यात येण्या ऐवजी बैल जंगलाच्या वाटेला लागला तशी ही मागून ओरडायला लागली, “अरे आता वर रानात जाव नको, मगे काळोख पडलो काय तुका पाठी येवक कळाचा नाय. गपचूप गोठ्यात ये आता.” गुरांकडे तिचा संवाद चालूच असतो. एकदा तर तिने कहरच केला. दुपारच्या वेळी गोठ्यात पेज वगैरे देण्यासाठी गेलीली असताना बहुतेक तिच्या नवीन बैलाने मान जोरात फिरवली असावी. ही लगेच मोठ्याने ओरडली “उं, असो काय तो करता? आज कापाड नेसलय म्हणान ओळखाक नाय काय?” बऱ्याच दिवसांनंतर माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी सण असावा आणि कापाड म्हणजे नवीन साडी.

herdsman-malvani-days
नाही, हा तो शेजारी नाही.

दुसरा एक शेजारी सकाळच्या वेळी स्वताच्या अंघोळीला जाताना बायकोला ओरडून सांगायचा, ” गो, टॉवेल दी ” मग न्हाणीतून परत एकदा ओरडायचा “चड्डी काढून ठेय गो”

तसं चाकरमानी आता मोठं प्रस्थ राहिलेलं नाही. पण त्यांची विचित्र भाषा फारशी बदललेली नाही. उदा: “गाडीच्या तिकटिच भेटल्या न्हाय आणि समदा गोन्धळ झाला तो येताना पोरांना खायला इसरलो.”

भाषा कोणतीही असो, जर भान ठेऊन ती वापरली नाही तर ऐकणाऱ्यांची भलतीच करमणूक होत असते.

गावात बहुतेक ठिकाणी पावसाळी शेती संपल्यावर लोकांना अगदी मोजकीच कामं उरतात. कुठेतरी डुक्कर किंवा मोठा साप अचानक समोरून जाणे, कुणाच्या तरी लग्नात विघ्न येणे अशा काही मोजक्याच घटना सोडल्यास विशेष काही घडतही नाही. कदाचित त्यामुळेच चार ओळींच्या घटनेला चाळीस ओळींची लांबण लाऊन सांगणे आणि ऐकणे असा गजाली हा प्रकार इथे खूपच लोकप्रिय आहे.

resting-cows-malvani-days
ती बिचारी शांतच असतात.

फक्त मयत सोडून इतर सर्व कार्यक्रमांना लाउड स्पीकर लागतोच. माझ्या सारख्या मोजक्या माणसांना त्याचा त्रास वाटतो पण बाकी ९९.९९% लोकांना तो कदाचित हवा असतो असे वाटते. आता तर डॉल्बी वर ट्रान्स लाऊन रात्री अपरात्री धुमशान चालूच असते.

धो धो कोसळणाऱ्या पावसात चढतीचे आणि उतरणीचे मासे पकडणे हा आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम इथे असतो. अलीकडे श्रावणात उपवास करणाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे. दरवर्षी गणपति प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो. या नंतर म्हाळवस – पितृपक्ष विधीपूर्वक पार पडतो. दिवाळी मात्र, पहिल्या दिवशी सकाळी पोहे खाऊन भात कापायला जाणे एवढीच मर्यादित राहिलेली आहे.

जानेवारीत होणारा गावदेवी भगवतीचा गोंधळ उत्सव खूप भक्ती भावाने साजरा केला जातो. भाविकांच्या अलोट गर्दीने संपूर्ण गाव गजबजून जातो. कदाचित या पंचक्रोशितील हा एकमेव मोठा आणि लोकप्रिय कार्यक्रम असेल.

या नंतर येणारे शिमगा, मांड, पारध, राखण रखवाली वगैरे प्रकार साल दर साल अगदी पारंपारिक रीतीने पार पडतात.

गावात कुठे मयत झालं तर काही वेळ सोडून ३-३ दादा बार लावण्याची पध्दत आहे. त्या आवाजाने संपूर्ण गावाला बातमी पोचते. काही वेळातच शेजारी, गावकरी पोचतात. अग्नी देण्यासाठी झाड तोडणे, लाकडं स्मशानात पोचवणे पासून ते अग्निसंस्कार होई पर्यंत सर्व काही सुरळीत पार पडतं. अगदी 10-12 व्या प्रर्यंत सर्व काही प्रथे नुसारच होत असतं.

ganapati-bappa-malvani-days
गणेश चतुर्थी हा कोकणच्या लोकांचा महाउत्सव.

छोटे मोठे भांडण तंटे होतही असतील. राजकारणं ही होत राहतात. काळानुसार आदराची आणि भयाची स्थानं बदलत राहतात. पण इथे ग्राम दैवत आणि कुल दैवत यांच्या वरील श्रद्धेला कधीही तडा जात नाही.

म्हणूनच कदाचित खून, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार, दुष्काळ, अपघात, फसवणूक इत्यादी राक्षस अशा गावातून हद्दपार झालेले दिसतात.
उंटावरून शेळ्या हाकणे ही फक्त म्हण असेल पण इथल्या गावात एका हातात मोबाईल फोन घेऊन मोटारसायकल वरून गुरं राखणारे लोक मी इथे पाहिलेत. इथल्या लोकांनी आधुनिक विश्वात वाटचाल करतानाही आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा वसा निश्चितच जपून ठेवलेला आहे.

 

nearest fish market
पण इथे नदीचे, चढणीचे आणि उतरणीचे मासे डिमांड मध्ये.
nearest dam
कळसुलीच्या धारणा मुळे उसाचं पिक घेणं शक्य झालंय.
paddy field ploughing - malvani days
कोकणातील भात शेतीला tractor चा मोठासा उपयोग नसतो.
sugarcane crop
माझ्या धाकट्या भावानेही थोडासा उस केलाय.
preparations for sugarcane cultivation
उसाची लावणीची पूर्व तयारी.
bird that mostly found in villages
कवडो काय तो?
making of Ganesh idols
गणपतिची शाळा
mango-season-begins-malvani-days
इथे डिसेंबरला आंबे मोहरायला सुरुवात होते.
cashew fruits - malvani-days
जानेवारी – फेब्रुवारीत काजू लागायला सुरुवात होते.
phanas - jackfruit
फणस खायला मात्र इथे मे महिना यावा लागतो.
tulasi vivah - malvani days
तुळशीचे लग्न
सापाच्या गजाली आवडीने ऐकल्या जातात.

मालवणी डेज
Tagged on: