बारको तथा बाळकृष्ण किर्लोस्कर, उंची ५ फुट, कुरळे केस, मोठे डोळे, बारीक देहयष्टी, भेदक नजर, शि़क्षण १२वी नापास, कायम  इनशर्ट, एकंदरीत ध्यानच पण तेचे गजाली भारीतले. गावात, घरची माणसे त्यात करुन लहान  मुले समोर “बाळाकाका” म्हणतात. अपरोक्ष व संपुर्ण पंचक्रोशीत “बारको” म्हणूनच प्रसिध्द.
आयुषात बारक्याने लग्न व दोन मुले, मोठी मुलगी व एक मुलगा ही दोन चांगली कार्ये केली. काम म्हणाल तर अनेक प्रकाचे उपद्व्याप केले. तुम्ही त्याला काम म्हणा अगर काहीही म्हणा, शेतीपासून चारहात लांब.  तरी पण बारक्याची महती पंचक्रोशीत घराघरात. बारको म्हटल्यावर सर्वाना आठवणारी मुर्ती.
कारण ही तसेच आहे. सामाजिक कार्य ,लग्न, जत्रा, गाव जेवण, मयत व निवडणूका यामध्ये बारको नाही असे होणेच नाही. असा सर्वव्यापी माणूस त्याला दोन व्यसने, एक मटका लावणे व गजाली मारणे. सकाळ झाली की, पानपट्टीवर दिवस सुरु तो रात्रीच्या शेवटच्या गाडीपर्यंत विविध उपक्रम साजरे करुन दिवसभराची कमायी करुन घरी.

मालवणीत “हळकुंडाच्या पदरात शेळकुंड”  म्हणतात. इथे उलट. बायको, मुले व पेन्शनर आई यांच्या पदरात हे “शेळकुंड” होते. आई म्हणजे त्याची “आये” सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पुरविणारी घरगुती पतसंस्था व हक्काने जेवण वाढणारी, बायको हक्काने भांडण्यासाठी व सर्व सांसारीक जबाबदार्‍या पेलणारी, हुशार,कष्टकरी स्त्री कशी काय याला मिळाली हा प्रश्नच ? त्यापेशा याच्या  बरोबर कशी राहते हा त्यापेशा मोठा प्रश्न. मुलगी समंजस, हुशार तसाच मुलगा. एकंदरीत कुटूंबात कर्ता पुरुष हा मानाने तोच होता.

दोन भाऊ मुंबईला व्यवस्थीत नोकरीला. मोठ्याचे याच्यावर बारीक लक्ष. कारण ही तसेच, रोजच्या आर्थिक उलाढाली व समस्या यामुळे जी काही सुनामी, फयान निर्माण व्हायची त्यावर तोड्गा काढणे. प्रसंगी बारक्याला शिस्त लावणारे दोनच माणूस, हा भाऊ व मोठ्या बहिणीचा मुलगा, या दोन व्यक्ती सोडल्या तर बारक्यावर कोणाचीही हुकुमत नाही.

स्वयंभु देवस्थानाप्रमाणे बारका हा यांच्या अपरोक्ष घरात सर्वेसर्वा होता. त्याची खासियत म्हणजे त्याचे उपद्व्याप व पैसा मिळविण्याचे त्याचे मार्ग. त्यातील जसे आठवतील तसे कीस्से मी सांगणार आहे.

गजाली एसटीच्या  तिकीटाचे

गजाली बारक्याचे - बाळकृष्ण किर्लोस्करलग्नाचो सिझन संपत इलो. पण गाड्येंका गर्दी बेसुमार; नेहमीप्रमाणे बारको कणकवलीत सात आणि आठ नंबर प्लॅट फॉर्मवर टकामका करीत होतो. इतक्यात चुलत भयन चेडवाक घेवन दिसली. नविन जोडा आणि सासरो सगळ्याका घेवन भयन मामाच्या देवाच्या पाया पडाक येता, ह्या ह्येना कधीच ओळख्ल्यान.

बारको लगेच गजालीक इलो. भयनीन कपाळाक आठ्ये घातल्यान. पण नाईलाजान “बाळ्या बरा झाला भेटलस तो, जावयांका देवाक पाया पडाक न्हेतय” सांगीतल्या बरोबर बारक्यान हसान अगदी आपुलकेन जावयांच्या हातात हात दिल्यान. ” चला चाय घेवया जावयानू ” बिचारो जावय नविन आदरातिथ्यात भारावलो. तेच्यापेक्षा तेचो बाप. चाकरमानी म्हातारो गळाक लागतलो ह्या बारक्यान बरोबर ओळखल्यान. चहा पिताना आणि गाडी लागापर्यंत हे गाव गजाली बारक्यान लावल्यान.

जावय हल्लीचो आयकत रवलो. बाप मात्र गजाली मारण्यात रमान गेलो, तितक्यात गाडी इली. पाजया उंदरासारखा सराईत पणे बारको गाड्येत शिरलो. ही गर्दी, तरी बारक्यान पुढे तीन सीट अडवल्यान. जावय, म्हातारो आणि भाचयेक बसवल्यान. चुलत भयनीक अ‍ॅडजेस्ट करुन तेच्या भाषेत दिल्यान. म्हातारो आणखीनच भारावलो. स्वतः कंडक्टरच्या बाजूक स्टायलीत उभो. गाडी सुरु झाली. तसो बारक्यान तंबाखु भरल्यान आणि ओळखीच्यांका नजरेन, हातान खुणावत भयनीक घेवन चलतय सांगत होतो. इतक्यात कंडक्टरान तिकीट मागल्यान, मघापासून म्हातारो लक्ष ठेवतच होतो. सासरेबुवान “पावन्यानू मी काढतय” करुन पाचशेची नोट काढल्यान. बारक्यान आपलो उगीच ‘रवांदे पावण्यानू, मी काढतय’ करुन आव आणल्यान. अर्थात तिकीट काढूचा नाय होताच.

सासरेबुवानी जोर करुन मास्तर, कीर्लोस पाच द्या, करुन पाचशेची नोट पुढे केली. बारको आपलो उगीच रवांदे करीत हात पुढे करुन गर्दीतसून पुढे इलो नी नोट बरोबर हातात घेतल्यान, काढलेली तिकीटा आपल्या खिशात ठेवन उरलेली पास केल्यान.

पाचशेची नोट बघून कंडक्टर बोललोच. हा “चाकरमानी इलेहत” सुटे नायहत, वायच थांबा. बारक्यान सुचक नजरेत सासरेबुवांकडे बघल्यान. तरी भयनीचो लक्ष होतोच, ती पचाकलीच, बाळा सुटे? तेच्यावर सासरे बोलले “ते घेतील”.  बिचारा गप रवला. नविन जोडा खिडकेतून निसर्ग बघीत होता. आणि गाडीपण चढावाक लागली, तशी बाळ्याच्या डोक्यात युक्ती सुचाक लागली.

शेवटी पुढे पासून वारी करुन कंटक्टर अवतार धारण करुण मागे ईलो. आरडान आरडान तेचो घसो सुकलेलो. असरोन्डी मागे पडली, तशी बारक्याची चलबिचल सुरु झाली. हळूच संधी साधून बारक्यान अतिशय सभ्यपणे कंडक्टरकडसून उरलेले चारशे बावन्न रुपये घेतल्यान. आसान नसान भयन पाटी बघीत होती. बारको पोटातसून गाळी घालीत होतो.

शेवटी तेका होयी तशी संधी गावली. कालच्या कीर्तनाची माणसा देवळाच्या स्टॉपवर वर चढाक आणि गाड्येतली माणसा खाली उतराक एकच गर्दी झाली. आणि तेच्यातसून बारको सटाकलो.

दोन स्टॉप पुढे दुकानाकडे भयनीन जावयांका आणि सासर्‍यांका उतराक सांगल्यान. तरी तेची नजर बारक्याक शोधीत होती. उतारल्यावर सासरेबुवा विचारुक लागले, ते तुमचे हे कुठे? बिचार्‍या भयनीचा तोंड बघण्यासारखा झाला. तीना वेळ मारुन नेल्यान, तो मागे उतारलो आसतलो गावकरांका सांगाक्. देवळात गेलव काय गावतलो. बिचारो सासरो तसो हादारलोच. पण आशेवर रवलो.

आज दोन वर्षान चेडवाक झील झालो. सासरो वाट बघून थकलो, बारको काय कधी गजाली मारुक ईलोच नाय्, काय सासर्‍याची दमडी पण परत गावली नाय.

…सना

गजाली बारक्याचे – बाळकृष्ण किर्लोस्कर
Tagged on: