कोकणात लोकसंख्या आणि गावं तशी लहानच. घाटावरच्या सारखी लाख लाख वस्तीची शहरे इथे नाहीत. त्यात करुन रत्नागिरी सोडले तर, म्हण्यासारखे मोठे शहर नाहीच. हल्ली चिपळूण सारखी तसेच हायवेवरची गावे वाढत असली तरी पुर्वांपार कोंकणचा आठवडा बाजार हा गावा गावातून पंचक्रोशीत आज ही भरला जातो.

प्रत्येक तालुक्यात पंचक्रोशीत एका गावात पुर्वांपार आठवडा बाजाराचा दिवस ठरलेला आहे. कणकवली -मंगळवार, मालवण -सोमवार, कुडाळ -बुधवार, कसाल -गुरुवार. असे बाजाराचे दिवस जवळपासच्या गावातील शेतकर्‍याना व विक्रेत्याना पाठ झालेले असतात. काही गावात आठवडाबाजार काही ठराविक वस्तूंसाठी पण प्रसिध्द असतात. काळाप्रमाणे बाजार बदलले, वस्तू बदलल्या पण वातवरण तसेच आहे. या बाजारांचे वैशिष्ट्य म्हणजे सिझनप्रमाणे बाजारातल्या वस्तू पण बदलतात. प्रत्येक बाजारात चहा, भजी व वडा पावची हॉटेल मात्रे असणारच.

कोंकणातील पावसाळी बाजार

कोंकणचा आठवडा बाजार - konkan market dayपावसाळ्याच्या सुरवातीला भरणारा कोंकणचा आठवडा बाजार, चतुर्थीचा किंवा श्रावण महिन्यातला बाजार, भात कापणीच्या वेळी भरणारा बाजार यामध्ये अनेक बदल दृष्टीक्षेपात येतात. बाजाराच्या दिवशी व आदल्या दिवशी व्यापार्‍यांचे येणे. गच्च भरलेल्या गाड्या, रीक्षा, बायका मुलांची गर्दी एअकमेकांच्या कौटुंबिक गोष्टी, बातम्या, लग्न जुळवणी, वाईट बातम्या, सण समारंभ, अडीअडचणी यांची सर्वात मोठी देवाण घेवाण याच बाजारात होत असते. सुरुवात पावसाळ्याच्या थोड्या अगोदर भरणार्‍या बाजारापासून करावी लागेल. कोकणात त्याला ”मिरगाचो बाजार” असे म्हटले जाते.

ज्या गावात बाजार भरतो. ते ठिकाण एकतर गावाच्या मध्यवर्ती किंवा नदीच्या जवळ अथवा जून्या गावठाण भागात असते. बाजारात व्यापारी किंवा विक्रेते व बहूतांश फिरते. व कायम बाजार असेल तर स्थानिक दुकाने यानी भरला जातो.यातही मिरगाचा बाजार जास्त करुन शेतकर्‍यांसाठी भरला जातो. हे बाजार मे महिन्यापासून जूनच्या दहा, पंधरा तारीखपर्यंत भरतात. कोकणात पावसाळा मोठा शेती सुरु झाली की शेतकरी सहसा बाजाराला येत नाही. अशावेळी पावसाळी बेगमी करुन ठेवावी लागते. त्या दृष्टीने आठवडा बाजारात ”म्हावरे बाजार” हा मुख्य बाजाराच्या थोड्या बाजूला भरतो. विशेष करुन खारवलेले सुके मासे जे पावसाळ्यात उपयोगी पडतील त्याचा बाजार असतो. सुक्या माशात ”दोडी” -दोडकारे, बांगडे, गोलिम इत्यादी. मासे असतातच शिवाय सुकवलेली मोरी, वाघळी हे पण मासे असतात. शेतकर्‍याना शेतीच्या दिवसात हे मासे दोन महिने जेवणात वापरायला फार उपयुक्त ठरतात.

मसाला करुन ठेवणे ही आजही इथली पध्दत आहे. वर्षभर पुरणारा मसाला करण्यासाठी गरम सामान म्हणजे हळकुंड, धणे, दगडफुल इत्यादी व घाटावरुन आलेल्या व्यापार्‍यां जवळची मिरची खरेदी केली जाते. कांद्याचे पोते, बटाटे हे विकाउ म्हणून तर मिठाची पिशवी. त्याला ”फरी” म्हणतात. हा सगळा ऐवज खरेदी करण्याकरता कोंकणचा आठवडा बाजार भरतो.

शेतकऱ्यांच्या साठीचा बाजार

त्यानंतर शेतकर्‍याना  लागणार्‍या वस्तू, नांगराची पाते, ”लाकडी नांगर” / त्याचे पाते. ”जगाल”, इशाड, जू, जुपण्या (दोर्‍या). पेंड्, इत्यादीचा बाजार असतो. कांबळी ”घोंगडी” घेऊन घाटावरचे व्यापारी शेतकर्‍याना पटवत असतात.

त्यात करुन गुरांचा बाजार ही काही ठराविक जागी भरतो. शेतीसाठी बैल जोडी घ्यायला तज्ञ मंडळी पानखात, विड्या ओढत बाजार फिरतात. नवखे बैल त्याना बुजत असता तर विक्रेते सराईत पणे त्याना पटवत असतात. बैलगाडी वाल्यांसाठी एखादा व्यपारी नाल ठोकायचे काम करतो. शेतकर्‍याचे जवळपास सर्व कुटूंबच ह्या बाजारांसाठी गर्दी करते.

पावसाळ्यात सुकणार नाहीत म्हणून रस्तावर बसलेल्या कपडेवाल्याकडून घासाघीस करुन मोडक तोड्क हिंदी बोलत सुध्दा बायका, मुले, पुरुष कपडे घेतात. थोडा पाऊस पडायला लागला की भात बियाणे व खत खरेदी करणार्‍यांची एकच झुबंड उडते. पुर्वी बियाचे भात शेतकरी घरातच ठेवायचा आता सरकारी बियाणे मिळायला लागल्या बरोबर त्याची खरेदी होते. त्यांची नावे पण आकर्षक असतात. उदा. सोनम, रुपाली, इंद्रायणी इत्यादी.

मध्ये मध्ये कोंबड्यांचा बाजारही असतो. मे महिन्यापर्यंत चाकरमान्याना घालून कोंबडी संपल्यामुळे पाळण्यासाठी कोंबडी खरेदी होते. स्थानिक शहरी माणसे मात्र आठवड्याची भाजी, छत्र्या, चप्पल, इत्यादी घेण्यासाठी गर्दी करतात. ऐन पावसात हे आठवडा बाजार रोडावतात. पानसुपारीसाठी किंवा इर्ली घेण्यासाठी हल्ली प्लास्टीकच्या, पिशव्या तरवा काढताना जास्त वापरतात. शेतकरी येतात.

कोंकणातील सणांचा बाजार

भात लावणी संपली की श्रावण महीना म्हणजे सणांचा महिना. मनासारखी लावणी झाल्यामुळे आता नागपंचमीचा बाजार भरतो. मातीचे रंगवलेले नागोबा,ल्हाया, फुले इत्यादीच्या खरेदीसाठी बाजार भरतात. पावसाळ्यातील बेगमी संपत आलेली असते. सणांचे बाजार सुरु होतात.  पावसाळी भाज्या, काकड्या, दोडकी इत्यादीनीं बाजार भरतात. शेतीच्या गोष्टी करत शेतकरी उत्साहाने सणांसाठी बाजारात येऊन खरेदी करतो. आताचे बाजार पुर्ण वेगळे फुलानी व भाज्यानी सजलेले असतात.

यात सर्वात मोठा बाजार म्हणजे चतुर्थीचा!! मुळात कोकणात घराघरात गणपती येत असल्यामुळे आठ दिवस आधीच व नंतर अकरा दिवस हे बाजार भरले जातात. असतील नसतील त्या भाज्या घाटावरचा व स्थानिक यांचे वेगवेगळे बाजार भरतात. फुलांचे बाजार भरतात. फुलांचे बाजार, फटाके सजावटीचे साहित्य गणपतीच्या वर सजवायची मंडपी त्याचे सामान, हळदीची, केळीची पाने, गावात दोन्-तीन गणपतीच्या शाळा तेथे मुर्त्याबनवल्या जातात. दर वेळेला कोण गणपती बरा करतो. यावर चर्चा गणपतीच्या वाढत्या किमती महागाई तरी उत्साहात होणारी खरेदी त्यावरच्या चर्चा चाकरमान्यांचे आगमन यानी बाजार फुलतो. पावसाळ्यात आलेल्या पुरांबद्द्लही चर्चा होतात. एकंदरीत वातावरण उत्साह वर्धक असते. चतुर्थी संपली की पितृपंधरावडा म्हणजे ”म्हाळवस” त्याचे बाजार भरतात. जेवणकरी राहणारी जोडपी. शेंवतीची पाती माळलेल्या बायका व पान खाऊन म्हाळाच्या गोष्टी करणारे त्यांचे नवरे. काळ्या वाटाण्याची आमटी व वडे यांनी घराघरातील म्हाळांचे जेवण व त्यासाठी गच्च भरणारे बाजार त्यातच भात कापणी सुरु ही होते.

आता मात्र कोंकणचा आठवडा बाजार पुन्हा रोडावतो. महिनाभर शेतकरी भात कापणी, मळणी इत्यादी कामात असल्याने फक्त दिवाळीचा बाजार करायला एखादा बाजार भरतो. दिवाळीचा बाजार हा शेतकर्‍यांपेक्षा शहरी लोकांचा असतो. त्यामुळे शेतकरी फक्त वासाचा साबण उटणे घेण्यासाठी बाजार करतो. मात्र दिवाळीचे घरचे पोहे मुंबईपर्यंत पाठवायचे असतात. त्यामुळे नरकचतुर्थी ”चाव दिवसाच्या” आदल्या रात्री गावेगाव पोह्यांसाठी भात घेऊन रात्ररात्र गजाली करत पोहे घेण्यांची एकच धांदल असते. त्यानंतर मात्र तुळशीच्या लगनाचा बाजार भरतो. कोरीव काम केलेल्या दिंड्याचा काठ्या, चिंचा, आवळे, चुरमुरे व उस यांच्या खरेदीसाठी बाजार गच्च भरतात. तुळस रंगवायचे सामान नविन तुळस बांधले त्यांची खरेदी इत्यादी करता हा बाजार भरतो.

सुगीच्या दिवसातील बाजार

आठवड्याचा मच्छी बाजारयानंतर मात्र कोंकणचा आठवडा बाजार म्हणजे सुरु होणार्‍या जत्रांची नांदीच असते. आता समुद्रातले ताजे मासे यांच्या खरेदीसाठी पोहे, तांदूळ, उकडे तांदूळ पेज बनविण्यासाठी यांच्या खरेदी विक्री करता हे बाजार भरतात. एखाद्या वडाच्या झाडाखाली बांबूच्या वस्तू विक्रीला येतात. सुप, रवळ्या, टोपल्या, झाप, डाळ्या या वस्तूंचा बाजार भरतो. माताची भांडी, संक्रातीची सुगड, मडक्या, वाडगे इत्यादीचा बाजार भरला जातो. बैलगाडीच्या गोलाकार छाताला बाहेरुन ही मडकी बांधून आणली जातात.

थंडी संपून मार्च महीना येई पर्यंत काजूचा बाजार मोठा असतो. काजूच्या बिया, ओले काजूगर यांची मोठी उलाढाल चालते ओल्या काजूगरांची खरेदी चाकरमान्याना पाठवणे यासाठी खेड्यातील बायका पाचशे रुपयांपासून नंतर पन्नास रुपयापर्यंत ह्या गरांचे वाटे विक्रिला येतात. सुरंगीची फुले, फणसाची कोवळी फळे “कुवर्‍या” यांचा विशेष भर या बाजारांमध्ये दिसतो.

एप्रिल, मे तसेच जूनचा पंधरवडा यामध्ये भाज्या कमी व आंबे, गरे इत्यादी फळांचा बाजार जास्त होतो. कलमी आंबे, रायवळ आंबे, फणसाचे गरे, काजू, बोंडे इत्यादी टोपल्यातून घेवून बायका बाजाराला येतात. रायवळ आंब्यांना चवीसाठी एका बाजूला छिद्र पाडून गिर्‍हाइकाच्या हातावर रस टाकला जातो. त्यावरून चव बघून आंबे घेतले जातात. कालांतराने हे आंबे संपतात व लोणच्याचे आंबे व उशिरा होणारे सालढान, मालदेस असे आंबे येतात. नंतर वटपौर्णिमेचा बाजार येतो. करवंद, जांभूळ, आंबे, गरे यांचा शेवटचा बाजार भरतो. वटसावित्रीचे सामान व पावसाची लागणारी चाहूल यातूनच पुन्हा मिरगाच्या आठवडा बाजाराची चाहूल लागते. कधीच वर्ष संपते.

कोंकणचा आठवडा बाजार
Tagged on: