हल्ली सगळ्यांकडे मोबायल इले तसा बारक्याकपण वाटाक लागला; आपल्याकडे पण मोबाईल फोन आसाचो. किती स्वस्त झाले तरी हजार बाराशे तरी होयेच. आणि परत एकदा घेतलो काय तेका पोसूचो रतीब लागतोलोच. तरी आता बोलणा लय स्वस्त झाला. टीव्हीवर “वॉक व्हेन यू टॉक” बघून बघून बारक्याक थार होयना. बरा म्हणण्या सारखो आकडो पण हल्ली लागानासो झालो. नायतरी तो पैसो रवता खय पावळेचा पाणी पावळेकच जाताला. इल्लो पैसो परत मटको लावकच सरायचो.

मात्र एकदा जून महिन्यात मिरगाच्या दिवसात बारको अचानक मोबाईल फोन घेऊन इलो. बरा साधो नाय कॅमेरॅवालो, गाणी वाजणारो पीस, सेकंड हॅंड होतो. तरीपण साडे तीन – चार हजार किंमत नक्कीच होती. गावात सगळ्यांनी जवळपास चौकशी केली. बारक्यान खयसून घेतल्यान ता शेवट पर्यंत सांगल्यान नाय. वेळ मारुन नेय. शेवटी लोक कंटाळले. माका मात्र संशय होतो तसो सगळ्यांकाच होतो. हेना कोणचो तरी ढापल्यान. कारण शेतीसाठी खत घेऊन जाताना स्टँडवर एक चाकरमाणीन बाई त्या दिवशी मी मोठ्या मोठ्यान बोलताना आयकलय. “बंटीने ओ बाकड्यावर इथे ठेवला आणि गाडी आल्या बरोबर विसरला”.  “सोन्यासारखा फोन गेला की हो”. तो कोण तो बंटी बाजूक खापरासारख्या तोंड करुन उभो होतो. तेव्हाच माका डाउट इलो.  तो फोन सध्या बारक्याकडे वस्तीक इलोसा.

मोबाईल फोनचा गुपित

पण बारको तो. आजपर्यंत कोणाक ताकाक तूर लागाक दिल्यान नाय. मोबाईल फोन घेतल्यान तरी वापरुक कोणाच्या बापाशीक येता. तसो तो डोके बाज, थोडा थोडा शिकलो. कणकवलेक नेहमीची बसणारी मंडळी आसत. त्येच्याकडून सीमकार्ड बदलून थोडीफार माहिती करुन घेतल्यान. तरी सगळी फंक्शना काय आजून म्हायती नाय होती. पण हल्ली चेडवाचो आणि झिलाचो फोटो तेच्या मोबाईयलार मी बघलय. बायकोचो तो कधी काढूचो नायच म्हणा. आसो. मोबायल तर गावलो.

ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाले. बारक्यान झटान काम केल्यान. रात्र रात्र आबा सरपंचाबरोबर फिरलो. त्या बाबतीत त्येचो हात कोणच धरुचो नाय. अर्थात कमाईपण भरपूर केल्यान. मोबायलचो खरो उपयोग तेव्हाच झालो. आबा पण खुश. बारक्याक शोधूचो लागत नाय.

गजाली - बरक्याचो मोबाईल फोनशेवटी निकालाचो दिवस उजाडलो. कणकवलेक विद्यामंदीरच्या ग्राउंडवर पंचक्रोशीतल्या सगळ्या ग्रामपंचायतींचे एकत्र निकाल जाहीर होतले. गावा गावातून माणसा ग्राउंडवर जमली पोलिस बंदोबस्त जाम होता. अफाट माणूस, गाड्ये आणि पोलिस. तेच्यात आबांबरोबर गेललो बारको, खय चुकामुक झाली.सर्कलच्या आत येणार्‍यांका मोबाईल फोन न घेता प्रवेश देत होते. बारक्याक काय म्हायती. पोलिसांची नजर चुकवत सराईतपणे बारको घुसलोच. पुढे पुढे करीत पैल्या रांगेत थारावलो. तंबाखूचो बार भरून निकाल आयकत उभो रवलो. एक एक करीत किर्लोस गाव इलो. इतक्यात बारक्याचो फोन वाजलो. सगळ्यांचे फोन बंद, म्हणजे नायच होते आणि एकाचोच वाजलो. त्यात करून रिंगटोन पण भारी, बारक्या पोरांचो आवाज. “दादा फोन, फोन उचल ना रे ” बारको हडबडलो. इकडे पोलिसही चक्रावले. कणकवलीच्या सायबान स्टेजवरून उडी मारल्यान आणि दोन पोलिसांनी बारक्याच्या गचांडाक धरून स्टेज मागे घेवन गेले.

बारको चक्रावलोच. ही काय भानगड. सगळे लोक पण बघूक लागले. सायबाच्या क्रेडटीचो विषय होतो. सायबान फर्मावल्यान “पोलिस स्टेशनात घेवून जा” बारक्याची रवानगी स्टेशनात आणि फोन सायबाकडे. दोन तास स्टेशनात बसल्यावर सायब इलो. बारक्याक बघून सायबाच्या कपाळावर आठ्ये पडले. आत बोलावल्यान. “काय, खूप कॉल येतात, कोण तुम्ही ?” बारक्यान नाव सांगल्यान. सायबान चांगलोच तापवल्यान आणि मोबायल सुरू करून ढवळूक लागलो. बारक्याच्या डोक्यात आता हळू हळू प्रकाश पडाक लागलो. तसो सरावलेलोच तो. दोनदा जुगार खेळताना गावलेलो. थातूर मातूर उत्तरा देवन सुटाच्या मार्गावर होतो.

मोबाईल फोन आणि तसले क्लिप नाय?

इतक्यात सायबान “हे काय?” करून बारक्याच्या समोर मोबायल धरल्यान. काय तरी हलत होता. बारक्याक काय नीट दिसला नाय. सायबच बोललो. ह्या अश्लिल फिल्म कुठून आणल्या?  तसो बारको हबाकलोच. ह्या इतके दिवस दिसला नाय कसा? होता खय? साराइतपणे  बारको हाता पाया पडाक लागलो. सायब माझ्या पावण्यांचो तो, मुंबयचो. माका कायच माहिती नाय असला काय असता ता. सायब मात्र एक टक बघीत होतो. आता बारको समाजलो. मोबायल गेलोच. पण रात्री हयच रवाचा येताला.

पण बारक्याचा नशीब दांड्ग्या. आबा शोधित इले. सायबान हातात हात दिल्यान. आबांनी सारवासारव केली. जावंदे सायब, आमचो कार्यकर्तो, सोडून द्या. शेवटी चहा घेता घेता सायबान मोबायल देवून बारक्याक सोडल्यान. आता वाटेत आबांच्या मोटरसायकलवर मागे बसान येताना आबा आपले चौकशी  करतत. असा काय बारक्या, तुका काय म्हायती नाय, मोबाईल फोन बंद तरी करूचो. बारको आपलो “नाय आबनू, नाय आबानू” करीत उत्तरा देत होतो. पण मागे बसान हळूच मघासचे क्लीप शोधित होतो. च्यायला इतक्या आसान आपणाक गावला नाय कसा?

बरक्याचो मोबाईल फोन
Tagged on: