आठवणीतला आम्रवृक्ष – एप्रिल-मेच्या दिवसात मी दरवर्षी काहीसा nostalgic होतो. आठवतात शाळेत असतानाच्या काळातले हे दिवस. शाळेच सारं वर्ष मी या दिवसांची वाट पाहायचो. वार्षिक परिक्षा संपलेली असायची, शाळेला मस्त सुट्टी, अभ्यासाची कटकट नाही. मस्त relax दिवस असायचे. आणि त्या सुट्टीला चार चांद लागायचे हे कोकणात आजोळी जायचो त्या वेळी.

आठवणीतला आम्रवृक्ष - mango-treeकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आम्ब्रड नामक एक साधास खेड हे माझ आजोळ. खर-तर कोकणातलं कोणातच खेड साधसं नसत. आंबा, काजू, फणस, जांभळ- करवंद अशी विलक्षण संपत्ती

आणि निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेल सौंदर्य यामुळे ही गावं म्हणजे जणू अलिबाबाची गुहाच असतात. निदान अगदी अलीकडची so called development ची लाट पोचे पर्यंत तरी ती तशी होती.

आम्ब्रड हे असाच एक गाव. तिथे लहानपणी सुटीत जे दिवस घालवलेत ते खरच जबरदस्त मजेचे. मस्त धमाल केली आहे त्या वेळी. आणि त्या मजेचा एक प्रमुख घटक होता, आजोबांच्या घरासोमाराचा तों विशाल आम्रवृक्ष. माझ्या बालपणीच्या स्मृतींशी निगडीत एक प्रमूख दूवा.

तो आम्रवृक्ष वैशिष्ट्यपूर्ण होता

आंब्याचा तो वृक्ष तसा फार जुना, कमीत ते ६०-७० वर्षे जुना. ते एक पायरी आंब्याच कलम होत, सालादान जातीच्या आंब्यावर केलेल. त्यामुळे त्याच्या एका बाजूला पायरीचे आणि दुसऱ्या बाजूला सालादनचे आंबे लागत. एकाच झाडाला दोन प्रकारचे आंबे लागतात याच तेंव्हा फार अप्रूप वाटे. अर्थात अस्सल पायरीने ते झाड लगडलेल असताना त्या बेचव सालादन आंब्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत नसे.

तसा तो आंबा दरवर्षी लागे अस नाही. सहसा एक वर्ष सोडून तो लागे. पण आंबे असोत वा नसोत, त्या वृक्षाचा बाज वेगळाच भासे. त्याच्या गर्द सावलीत खेळताना आम्हा मुलांचा सारा वेळ जात असे. दुपारी पत्त्याचे डाव तिथे मांडले जात. कधी गाण्याचा भेंड्या खेळल्या जात, तर कधी नुसतेच बालिश पण मजेचे उद्योग केले जात. कधी त्याच्या सावलीत गाण्याचा भेंड्या रंगत. संध्याकाळी, पकड-पकडी, लपंडाव सारखे खेळ त्या झाडाच्या आसपासच होत. त्याच्या गर्द सावलीत बसल की वाटे जणू वेळ पुढे सरकूच नये. मी थोडाफार झाडावर चढायला शिकलो तो त्या वृक्षामुळेच. त्याच्या एखाद्या फांदीवर बसून नुसत्याच गप्पा मरणदेखील मजेच वाटायच.

आणि आंबे लागलेले असतील तेंव्हा तर त्याची शान भन्नाट असायची. पायरीचे आंबे तसे फार प्रचलित नसले, तरी दिसायला फार आकर्षक असतात आणि चवीला अतिशय सुमधुर. आणि मस्त रानवट गोडवा असलेले आमच्या त्या लाडक्या वृक्षाचे आंबे खाताना तर खरोखर भान विसरायला व्हायच. ते मस्त लाल-केशरी रंगाचे मोठाले पायरी आंबे खाताना मला तर नेहमी वाटायच, फळांचा राजा नाजूकसा हापूस नाही काही, तो मान तर या पायरीलाच मिळायला हवा. राजाची रग त्याच्याकडेच तर आहे.

आंब्यांनी भारलेला आम्रवृक्ष

आंब्यांनी भारलेला आम्रवृक्ष - mangoesझाडावरचे आंबे काढण ही पण एक मजा होती. उंचावरचे आंबे झाडावर चढून, खोबल्याने काढले जायचे. त्या वेळी काढलेले आंबे टोपलीत ठेवण चुकून खाली पडलेले आंबे गोळा करण, हाच आमचा खेळ असायचा. थोडे खालचे आंबे झाडावर न चढताच, खोबल्याने काढले जात. खालूनच, पानाआड दडलेले आंबे शोधण, त्या आंब्यांपर्यंत पोचण, आणि ते अलगद काढण, हि एक कसरतच होती. बाबांना या कसरतीची भारी हौस. मी ही, खोबल्याने असे आंबे काढण्याचे अयशस्वी प्रयत्न करायचो…. आणि असे आंबे काढतानाच, कितीशा झाडपिक्या आंब्यांचा फन्नाही उडायचा.

आम्ब्रडात मी घालवायचो वर्षातले फक्त काही दिवस. पण बालवयातल्या त्या दिवसांच्या स्मृती मनात अगदी घट्ट ठाण मांडून बसल्यात, आणि त्या स्मृतींशी तों आम्रवृक्ष अविभाज्यपणे जोडला गेला आहे. हळूहळू वर्ष पुढे सरकत गेली, शाळा कॉलेजच्या वाढत्या इयत्ता, पुढे नोकरी, यात आम्ब्रडला जाण थोड कमी झाल. पण मला नेहमी वाटायच, जेंव्हा-जेंव्हा मी आम्ब्रडला, जाईन, तेंव्हा तों वृक्ष धीरगम्भीरपणे हसत माझ स्वागत करेल, आणि त्याच्या थंड, मायाळू सावलीत, मी मनाचा सारा शीण घालवेन.

पण चिरकालीन अस्तित्वाची, मूभा निसर्ग कोणालाच देत नाही. दोन-तीन वर्ष आम्ब्रडला जाण झाल नाही. आणि एक दिवस, फोनवर बातमी कळली- तो जूना जाणता आम्रवृक्ष अखेर कोसळला.

मनावर चटकन वेदनेचा एक ओरखडा उमटला, क्षणभर बधीर झाल्यासारख झाल. त्या रात्री मला अन्न गोड लागल नाही. सारखा वाटत होत, माझ्या मनातल आम्ब्रड, पूर्णांशान नाही तरी खूपस बदललय.

आता आम्ब्रडला जातो तेंव्हा तों आम्रवृक्ष होता, तिथे नुसताच जाऊन उभा राहतो. आता तिथे नवनिर्मितीच्या खूणा दिसू लागल्यात. परिवर्तनवादी निसर्गाने जुन्या अस्तित्वाच्या खूणा केंव्हाच पुसून टाकल्यात. पण मी मनानेच माझ्या त्या जुन्या दिवसात जातो. त्या ठिकाणी उभा राहून, दोन क्षण का होईना, तिथल बालपण पुन्हा जागून घेतो. तेवढाच जरा मनाचा शीण हलका होतो.

……मंदार

आठवणीतला आम्रवृक्ष – आंब्यांनी भारलेला
Tagged on: