पूर्वीचा रत्नागिरी व त्यानंतर विजयदुर्ग ते रेडी व वैभववाडी पासून समुद्रकिनार्यापर्यंतचा हा भाग सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या जलदुर्ग “सिंधुदुर्ग” याच नावाने त्याचे नामकरण करण्यात आले. सुमारे १६० किमी. लांबीचा समुद्रकिनारा, निसर्गरम्य रेडी, शिरोडा, सागरेश्वर, वेळागर, मोचेमाड, बागायत, वायंगणी, कोंडुरा, कालवी बंदर, खवणे, निवती, भोगवे, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, आचरा, तांबळडेग, मिठबावा, देवगड, विजयदुर्ग इत्यादी समुद्रकिनारे, वेंगुर्ला, मालवण, देवगड बंदरे तसेच वाघोटन, आचरा, कालावल, कोळम, कर्ली, मोचेमाड व आरोंदा या खाड्या याला खलाटपट्टी असे म्हटले जाते.

पूर्वेच्या बाजूने प्राचीन सह्याद्री पर्वत व त्याच्या लहान लहान टेकड्या, त्यामध्ये आंबोली, नापणे अशी पर्यटन स्थळे या भागाला वलाटपट्टी असे संबोधले जाते. मध्यवर्ती येणार्या भागात धामापूर, वालावल, माणगाव हे शेतीसाठी अधिक प्रसिद्ध बागायती गाव व विशेष करुन छोटे तलाव असलेली गावे या भागात आढळतात.
सिंधुदुर्ग जिल्हा खलाटपट्टी व वलाटपट्टी
या दोन भागात नैसर्गिक साधनसामुग्री प्रमाणे लोकजीवनही बरेच वेगळे आहे. आता राजकारण,प्रगती तंत्रज्ञानामुळे हा फरक बराचसा कमी झाला तरी बारीक बघितल्यास खेड्यातून तो फरक लक्षात येतोच.
वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण यावर पूर्वीपासून शैक्षणिक व सांस्कृतीक पार्श्वभूमीचा बराच प्रभाव आहे. ब्रिटिश काळापासून भरभराटीचे गाव असल्यामुळे लोकजीवन दर्जेदार आणि सुशिक्षित आहे. शहरी संस्कृतीचा पगडा आहे. लोकांची वैचारीक पातळी पण वेगळी आहे. त्यात करुन निसर्गाचा वरदहस्त या पूर्ण खलाटपट्टीवर आहेच. घराभोवती माड, कलमे, काजूच्या बागा, कोकम, फुलांची झाडे, पोफळी, केळी, फणस, चिकू, पेरु अशी सर्व प्रकारची झाडे घरांच्या जवळपास दिसावीत ही याच भागात. शेती काही प्रमाणात कमी असली तरी बागायती उत्पन्न व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी इथले लोक मुळातच सधन व सुसंस्कृत.
त्या मानाने वलाटपट्टीची गावे ही मूलभूत सोयींपासून अजूनपर्यंत वंचितच होती. मुंबई – गोवा हायवे नंतर हळूहळू प्रगतीचा ओघ तिथे येत गेला. आता मात्र कणकवली, कुडाळ हा भाग प्रचंड प्रगतीकडे झेपावत आहे. तरी आजही शेतीप्रधान उत्पन्नाच्या बाबतीत नैसर्गिक देणगीचा विचार केला तर उष्ण हवामान व तेवढीशी सकस नसलेली जमीन, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी कणकवली तालुक्यातील गावे तशी मागासच आहेत. पावसाळी शेती व नंतर गरजेपुरती बागायती हाच प्रकार दिसतो. मात्र मजुरी काम व वाढत्या प्रगती बरोबर छोट्या मोठ्या नोकर्या व कंत्राटी कामे यामध्ये इथले तरुण जास्त भाग घेताना दिसतात.

सिंधुदुर्ग जिल्हा बदलत आहे
बदलत्या राजकीय समीकरणांमुळे परप्रांतीयांचे इथल्या सकस भूमीकडे लक्ष वळले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पैसा मिळवण्याचे जुने मार्ग आता खूपच बदलले आहेत. जमिनींची प्रचंड प्रमाणात होणारी विक्री, अमाप पैसा ओतून बांधकाम व बागायती यात गुंतवणूक करणारे परप्रांतीय आणि त्यातून स्वतःसाठी पैसा उभा करण्याकरता छोटी मोठी कामे व दलाली करणारे लोक असे चित्र आता दिसू लागले आहे. परवा परवा पर्यंत गर्द झाडी मध्ये असलेले डोंगर व त्यातील पारंपारिक रानमेवा हळूहळू नष्ट होऊन तेथे कॉम्प्लेक्स व जेसीबी फिरवुन प्लॉट पाडणे यामुळे शेतकरी नकळत भूमीहीन तर होतच आहे आणि नैसर्गिक समतोल पूर्ण बिघडतो आहे.
हे बदल अपरिहार्य असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा एकंदर आकार पाहता नष्ट होणारी नैसर्गिक जंगले, बंद होत असलेली शेती व अस्ताव्यस्त वाढणारी बांधकामे यामुळे घाटावरुन दिसणारे कोकणचे मोहक दर्शन प्रत्यक्षात यापुढे राहील का? हा एक प्रश्नच आह.
- मिरगाचो कोंबो – वडे सागोती - January 13, 2017
- सिंधुदुर्ग जिल्हा विशेष - September 15, 2016
- वेंगुर्ल्याची जत्रा - September 13, 2016