वेंगुर्ल्याची जत्रा म्हणजे पर्वणीच असते. किती देवळे व किती जत्रा, किती नाटक कंपन्या, गजबजलेली जत्रा पहावी तर वेंगुर्ल्यातच.

त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीची पहिली जत्रा व नंतर एकदा तशीच रामेश्वराची ही दुसरी जत्रा. जत्रा म्हटली की शाळा अर्ध्या दिवसाने सुटायची. आम्ही येतानाच देवळात फिरुन यायचो. देऊळ स्वच्छ केलेले असायचं. नविन रंगकाम, फुलांच्या माळा, अगरबत्तीचा वास, देऊळ प्रसन्न व्हायचे.

आवारात दुकानदार दुकान मांडायला सुरु करायचे. केळीवाल्या बायका आपापल्या  वार्षिक जागा हेरुन बसायच्या. फुलवाल्या बायका, खेळणीवाले, मिठाई / खाजेवाले, फुगेवाले किती प्रकारची दुकाने, सगळीकडे दुकानांची मांडामांड. तरी दुपारी कसं थोडं उघडं उघडं वाटायचं.

पण जस जशी संध्याकाळ व्हायची तशी आम्ही तयारी करु लागयचो. बाबांकडून जास्तीत जास्त पैसे पॉकेट मनीसाठी घेऊन आम्ही भाऊ भाऊ तसेच इतर शेजारची मुलं, मामांची मुलं सगळे मिळून जत्रेला जायची तयारी करायचो.

जस जसे देवळाकडे जायचो तसे ढोलांचे आवाज यायचे. वेगवेगळ्या खेळण्यांचे आवाज लाईटचा झगमगाट छाती दडपून यायची. देवळाच्या खूप आधीच केळी व फुलवाल्या बायका नारळ, अगरबत्तीवाले पुढे पुढे करायचे. टोपल्यातून माल घेऊन रात्रीच्या थंडीसाठी चादरी वगैरे घेऊन, उजेडासाठी दिवा पेटवून ही मंडळी देवळाच्या आधी बर्‍याच अंतरापासून बसलेली असायची.

वेंगुर्ल्याची जत्रा संध्याकाळ नंतर

वेंगुर्ल्याची जत्रासंध्याकाळी हळूहळू गर्दी वाढायची. आता सायकल, बाईकवाले व चालणारे यामुळे व दुकांनदारांच्या ओरडण्याने जत्रेचे वातावरण तयार झालेले असायचे. देवळाचा तर कायापालट झाल्यासारखे वाटायचे. लायटींच्या झगमगाटात ओटी भरणार्‍यांची लांबच लांब रांग, खेळण्याचे / फुग्यांचे आवाज, मिठाईची झगमगीत दुकान, चप्पलांचे ढीग यातून वाट काढत फिरता फिरता हॉटेलांकडे पावलं वळायची. गरमागरम भजी, उसळ, वडे तसेच मटण पुर्‍या यांचीही तैनात असायची. या हॉटेलात गरम भजी आहेत की दुसर्‍या करत फिरायचे. बाकड्यांवर बसून लोक एकमेकांना चहा भजी देत असायचे. खेळण्यांचा तर पुरच आलेला असायचा. बिचारा खेळणीवाला स्प्रींगसारखा चारी बाजूला  फिरायचा. मोठ्यांचे / बायकांचे ग्रुप वेगळे, मुलांचे वेगळे. सगळे जण जत्रा फिरत असायचे. काही भेल घेऊन गडग्यांवर, दिपमाळे जवळ बसलेले असायचे, गर्दी वाढतच जायची. बरेच जण पालखीसाठी थांबलेले असायचे. शेवटी बारा वाजता पालखी बाहेर पडायची. देवळाभोवती पालखी व फटाके वाजवल्या नंतर गर्दी थोडी कमी व्हायची. आता नाटकासाठी रहाणारे बायका व पुरुष बसायला जागा शोधायचे.

बाहेर एका मंडपात शंभरचा बल्ब लावून, एक पडदा ओढलेला असायचा. त्यात एक बाकडा व पेटीवाल्यासाठी खुर्ची असायची. नाटक सुरु व्हायला अजून तास दीड तास असायचा.

आम्ही मामा बरोबर दशावतारी उतरतात त्या धर्मशाळेत जायचो, तिथे झोपलेले काही नट  उठून स्वतःच्या मेकअपची तयारी करत असायचे. जेवण ही त्यांनी स्वतःचं स्वतःच बनवलेलं असायचं. ट्रंकेमध्ये सामान असायचं. त्यात गणपतीचा मुखवटा, तलवारी, गदा, कपडे, दागिने इत्यादी असायचे.

आमचे बाबा म्हणायचे “दशावतारी म्हणजे रात्री राजा सकाळी कपाळावर बोजा” ही म्हणच होती. पण आता काळ बदलला. दशावतारी कंपनीच्या गाड्या आहेत. बिदागीही चांगली आहे.

आता मंडपाच्या भोवती येण्या जाण्याची वाट सोडून पुर्ण गर्दी व्हायची. बायका मुले चादरी, स्वेटर घालून थंडीत झोपलेली पण असायची. पुरुष मंडळी मात्र हॉटेलामधून सोरट लावत तर काही  देवळात बसून असायचे. मामा आमच्यासाठी एक बाकडा आणायचा आम्हीपण  चहाभजी खाऊन नाटक सुरु व्हायची वाट बघायचो. नाटक पहाता पहाता चक्क सकाळ व्हायची. अशी ही वेंगुर्ल्याची जत्रा आजही आठवणीत तशीच फुलते.

….सना

वेंगुर्ल्याची जत्रा